रानडुकरांनी केल्या केळीबागा उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 02:00 PM2020-11-19T14:00:15+5:302020-11-19T14:21:24+5:30
भडगाव तालुक्यातील वाडे येथील तळाव शिवारात सध्या रानडुकरांच्या कळपांनी थैमान घातले आहे.
भडगाव : तालुक्यातील वाडे येथील तळाव शिवारात सध्या रानडुकरांच्या कळपांनी थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हजारो नवती केळी झाडांचे नुकसान रानडुकरे करीत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वनविभाग सुस्त तर शेतकरी संतप्त झालेले आहेत. तालुक्यातील वाडे येथील तिखीबर्डी वस्ती परीसरात तळाव शिवारात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकासह फळबागायत व इतर पिकांची लागवड केलेली आहे. शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन कष्टाने केळीसह इतर पिके हिरवळीने फुलवित आहेत. तळाव भागालगतच डोंगराळ व खडकाळ भाग आहे. या भागातच वनविभागाचे झाडे झुडपे आहेत. या हिरवळीच्या जंगलात रानडुकरे, हरीणी, ससे, रोही, कोल्हे, सायङ यासह वन्यप्राण्यांचा वावर असतो. माञ रानङुकरांचे कळपांनी सध्या मोठे थैमान घातले आहे. रानङुकरे मोसंबी, केळी आदी पिकांसह शेतातील ठिबक सिंचनचे नुकसान करताना दिसत आहेत. रानडुकरे हे रात्रभर अंधारात शेतांमध्ये केळी पिकात घुसुन नुकसान करीत आहेत. शेतकरी रात्रभर या रानडुकरांवर पाळत ठेवत केळीसह पिकांचे नुकसान होऊ नये, याकरिता सतर्कता बाळगतात. मात्र तरीही रानडुकरे केळी, मोसंबी पिकांचे नुकसान करीत आहेत. यावर्षी नुकसानीचे जास्त प्रमाण वाढल्याचे गिरीष लक्ष्मण महाजन यांच्यासह काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तळाव शिवारात केळी पिकाचे नुकसान झालेले शेतकरी असे आहेत.याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. शेतकर्ऱ्यांना पिक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होताना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नारायण सुपडु महाजन यांचे ३०० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. विजयसिंग भावसिंग गोमलाडू यांचे २००० नवती केळी झाडांचे नुकसान झाले आहे. भुतेसिंग धनसिंग परदेशी यांचेही २०० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. रामदास नथ्थु महाजन यांचे २५० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. गिरीष लक्ष्मण महाजन यांचेही २०० केळी झाडांचे व मोसंबी पिकाचे नुकसान झालेले आहे. मानसिंग भगा परदेशी यांचे २०० केळी झाडांचे, तसेच मळगाव रस्ता वाडे शिवारात अनिल सुपडू पाटील यांचेही १२५ केळी झाडांचे नुकसान झाले आहे.
सध्या रानडुकरांच्या कळपांनी धुमाकुळ घातला आहे. शेतशिवारातील नवती केळीसह पिकांचे नुकसान रानडुकरे करीत आहेत. माझेही ३००च्या जवळपास केळी झाडांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. वनविभाग हद्दला लागुन शेतांजवळ तारकंपाउंड करावे, अशी आमची मागणी आहे.
-नारायण सुपडू महाजन, शेतकरी, वाडे, ता. भडगाव.
वाडे येथील तळाव शेत शिवारात रानडुकरांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या अंधारात ही रानडुकरे नवती केळी पिकासह मोसंबी आदी पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. आमचेही नवती केळी झाडांचे जवळपास २००० झाडांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा.
-विजयसिंग गोमलाडू, शेतकरी, वाडे, ता. भडगाव.