मुक्ताईनगरात गटशिक्षणाधिकाऱ्यास लाच घेतांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 06:23 PM2018-04-21T18:23:55+5:302018-04-21T18:23:55+5:30
वैद्यकीय बिल मंजुरीसाठी शिक्षकाकडून घेतले तीन हजार रुपये
आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.२१ : मुक्ताईनगर- शाळेच्या वार्षिक तपासणीत अनुकूल अभिप्राय देणे व वैद्यकीय बिल मंजुरीसाठी शिफारस करण्याकामी तीन हजाराची लाच स्वीकारताना प्रभारी गटशिक्षणाधिकारी जे. डी. पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून रंगे हाथ अटक केली. ही कारवाई शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पं.स.आवारातील शिक्षण विभागाच्या इमारतीत करण्यात आली.
जि.प. शिक्षण विभाचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी जे.डी. पाटील यांनी तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाकडे शाळेच्या वार्षिक तपासणीत अनुकुल अभिप्राय देणे व त्यांचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी शिफारस देण्याच्या मोबादल्यात साडेतीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली व शनिवारी दुपारी जे.डी.पाटील कार्यालयात असतांना शिक्षकाकडून तडजोडीअंती तीन हजाराची रक्कम लाच म्हणून स्वीकारताना त्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. तत्काळ लाचखोर अधिकाºयास अटक करून पथकाने त्यास सोबत नेले. उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या पथकाने केली.