कन्नड घाटात वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या तीन किमी पर्यत रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:49 PM2017-10-30T12:49:58+5:302017-10-30T12:53:47+5:30
रविवारी मध्यरात्री पासून वाहतूक खोळंबली
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 30 - राष्ट्रीय महामार्ग क्र. 211वर (धुळे - सोलापूर) कन्नड घाटात सोमवारी पहाटेपासून वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या तीन कि.मी. पर्यत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अवजड वाहनांसह प्रवाशी वाहनेही अडकून पडली आहे.
गेल्या महिन्यात पावसामुळे चाळीसगाव शहरापासून 15 कि.मी. अंतरावर कन्नड घाटातील रस्ता दोन ठिकाणी खचला. रस्ता दुरुस्तीसाठी घाटातील वाहतूक थांबविण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यामुळे घाटातील वाहनांची संख्या वाढल्याने ट्रॉफीक जाम होण्याचे प्रसंग वारंवार येत आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला होता. तिथे अजूनही एकेरी वाहतूक होते. यामुळे दोन वाहने समोरासमोर येऊन वाहतुकीचा खोळंबा होतो.
रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे अवजड वाहने वाढल्याने वाहतूक थांबली. यात बसेससह प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनांचाही समावेश आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांची रांग मोठी होत आहे. राजमार्ग प्राधिकरणाच्या कर्मचा-यांनीदेखील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लक्ष देण्याची मागणी असून ट्रॉफीक जाममुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.