जळगाव-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाची एक बाजू जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 10:55 AM2019-02-07T10:55:55+5:302019-02-07T10:56:53+5:30
मुंबईतील बैठकीत घेतला आढावा
जळगाव : जळगाव ते औरंगाबाद राष्टÑीय महामार्ग क्र.७५२ च्या चौपदरीकरणाच्या एका बाजुचे काम येत्या जुलैअखेर पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसेच राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच्या तरसोद-फागणे या टप्प्याचे काम रखडले असून ते आठवडाभरात सुरु होणार असल्याचेही सांगण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मुंबईत बैठक झाली.
तरसोद-फागणे या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे मक्तेदाराच्या आर्थिक अडचणीमुळे काम रखडले होते ते आठ दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
जळगाव-औरंगाबाद रस्त्याची दैना
जळगाव-औरंगाबाद राष्टÑीय महामार्ग क्र.७५२ च्या सुमारे १४७ किमी लांबीच्या चौपदरीकरणाची निविदा काढण्यात येऊन सुमारे वर्षभरापूर्वी मक्तेदारामार्फत काम सुरू करण्यात आले आहे. या पूर्ण लांबीचे काँक्रीटीकरण करण्याचे प्रस्तावित असल्याने मक्तेदाराने संपूर्ण रस्ताच खोदला असून सपाटीकरण करणे सुरू आहे. मात्र मध्येच हे काम निधीअभावी रखडल्याने खोदलेला रस्ता तसाच पडून असल्याने या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरले आहे. जळगाव-औरंगाबादला पूर्वी बसने साडेतीन तास लागत असताना सध्या पाच तास लागत आहेत. वाहनांचेही खराब रस्त्यामुळे नुकसान होत आहे. याबाबत ओरड सुरू असल्याने मुंबईत झालेल्या बैठकीत या कामाचा आढावा घेण्यात आला.
१४७ किमी पैकी ५ किमी काँक्रीटीकरण
जळगाव -औरंगाबाद चौपदरीकरणाचे निधीअभावी बंद पडलेले काम आता पुन्हा सुरू झाले असून १४७ किमी अंतरापैकी सुमारे ५ किमी लांबीचे काँक्रीटीकरणही झाले आहे.
नागरिकांची गैरसोय होत असल्याने हरीभाऊ बागडे व गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाºयांची कान उघाडणी केली. तसेच काम तातडीने पूर्ण करण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या. तसेच काम पूर्ण होईपर्यंत रस्त्याच्या कडेने मुरूम टाकून व तो रोडरोलरने दाबून नागरिकांना वाहन नेणे सोयीचे व्हावे, यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
तरसोद-फागणे टप्प्याचे कामही
राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या तरसोद ते फागणे या चौपदरीकरणाचे कामही मक्तेदाराच्या आर्थिक अडचणीमुळे ठप्प झाले होते.
त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. ही अडचण आता दूर झाली असून दहा-बारा दिवसांत काम सुरू होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
असा असेल शहरातील चौपदरी रस्ता
अजिंठा चौफुलीपासून शहराच्या हद्दीतील ६ कि.मी.चा रस्त्याचे चौपदरीकरण करताना रस्ता काँक्रीटचा केला जाणार आहे. त्यात मध्यभागी दीड मीटरचा रस्ता दुभाजक व तेथून दोन्ही बाजूला प्रत्येकी ७.५ मीटरचा काँक्रीटचा रस्ता असेल. तसेच दुभाजकापासून १५ मीटर अंतरावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटार व त्यावर फुटपाथ असेल. तेथून काँक्रीटच्या रस्त्यापर्यंतच्या रुंदीचे डांबरीकरण केले जाणार आहे. शहरातील ६ कि.मी.चा रस्ता भव्य होणार आहे.
काम पूर्ण होण्यास होणार विलंब...
मक्तेदारास कार्यादेश देण्यात आले असून त्यात हे काम २ वर्षात पूर्ण करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार मक्तेदाराने सपाटीकरणाचे काम हाती घेतले होते. शहराबाहेरील काम मक्तेदार पूर्ण करीत आहेत. एक वर्षाचा कालावधी संपला असून अजून वर्षभराचा कालावधी उरला आहे. मात्र निधीमुळे काम रखडल्याने ठरलेल्या दोन वर्षांच्या मुदतीत म्हणजेच उरलेल्या वर्षभरात हे काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळेच एका बाजूचे काम जुलैपर्यंत तातडीने पूर्ण करून नागरिकांची गैरसोय टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जुलैपर्यंत एक बाजू पूर्ण करणार... या बैठकीत औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले की, मक्तेदाराच्या आर्थिक परिस्थिती अभावी काम ठप्प झाले होते. या कामासाठी १०० टक्के निधी हा शासनाकडूनच (‘एमओआरटीएच’ मार्फत) देण्यात येणार आहे. मात्र मध्यंतरी शासनाकडून निधीच न मिळाल्याने हे काम रखडले होते. मात्र आता शासनाने काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने काम पुन्हा सुरू झाले. तसेच या १४७ किमी लांबीच्या रस्त्याची एक बाजू जुलैपर्यंत काँक्रीटीकरण करून देण्याचे आश्वासन बैठकीत दिले असल्याचे सांगितले. तर जलसंपदामंत्री महाजन यांनी मार्च अखेरपर्यंत एका बाजूचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
शहराबाहेरही काँक्रीट रस्ता
४शहराबाहेर मात्र मध्यभागी दीड मीटरचा दुभाजक व दोन्ही बाजूला ७.५ मीटर रुंदीचे काँक्रीट रस्ते व १ मीटरची साईडपट्टी असेल.
तीन टप्प्यात मक्ता औरंगाबाद हद्दीपासून काम
४औरंगाबाद- सिल्लोड-जळगाव हा रस्ता राष्टÑीय महामार्ग म्हणून (एनएच ७५३एफ) घोषित झाला आहे. त्यात औरंगाबाद ते सिल्लोड व सिल्लोड ते जळगाव जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत असे दोन टप्पे व जळगाव जिल्ह्याच्या हद्दीपासून ते अजिंठा चौफुली (१०० ते १४६ कि.मी.) हा तिसरा टप्पा, असे तीन टप्पे करून मक्ता देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील काम मक्तेदाराने औरंगाबाद हद्दीपासून सुरू केले आहे.