जागतिक साळी फाऊंडेशनच्या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील तीन विधवांना आत्मनिर्भर करण्याचा निश्चय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:10 AM2018-11-06T00:10:32+5:302018-11-06T00:11:20+5:30
मुंबईत झालेल्या जागतिक साळी फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापनदिन सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील सावदा या गावातील दोन कुटुंंबाना, भुसावळ येथील एक, मालेगावमधील एक व सुरत येथील पाच अशा सात विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्याचा निश्चय फाऊंडेशनमार्फत करण्यात आला.
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : मुंबईत झालेल्या जागतिक साळी फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापनदिन सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील सावदा या गावातील दोन कुटुंंबाना, भुसावळ येथील एक, मालेगावमधील एक व सुरत येथील पाच अशा सात विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्याचा निश्चय फाऊंडेशनमार्फत करण्यात आला.
मुंबई येथील ‘रवींद्र नाट्य मंदिराच्या नाट्यगृहात मंत्रालयातील महसूल व वनविभागातील कक्ष अधिकारी विजय वक्ते व त्यांच्या पत्नी निशा विजय वक्ते यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या व साळी समाजातील होतकरू यांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘जागतिक साळी फाऊंडेशन’चा प्रथम वर्धापन सोहळा जगभरातील दोन हजार समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रारंभी भगवान जिव्हेश्वर, माता अंकिनी व माता दशांकिनी यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनी व युवक युवती यांच्या हस्ते करण्यात आली.
अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महिला साळी समाजाच्या अध्यक्षा शशिकला चौधरी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या नगरसेविका व अखिल महाराष्ट्र महिला साळी समाजाच्या अध्यक्षा अश्विनी मते, समाजसेविका शांताबाई जंत्रे व प्रमिला चिल्लाळ, फाऊंडेशनचे प्रणेते विजय वक्ते यांच्या आई पद्मावती नारायण वक्ते या होत्या.
दुसऱ्या सत्राची सुरुवात शासनाचे निवृत्त सचिव नंदकुमार जंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली व औषधनिर्माण शास्त्रातील शास्त्रज्ञ व युजीसीचे माजी सदस्य डॉ.एम.डी.कार्वेकर बंगलोर, तेलंगणा राज्यातील जिल्हाधिकारी व्यंकटेश धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक अतिथीचे सन्मानचिन्हे देवून सन्मान करण्यात आला. नेदरलँड, युएसए, दुबई, आॅस्ट्रेलिया तसेच भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातून समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.