अनलॉक नंतरही जळगावात ‘देऊळबंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:05+5:302021-06-16T04:24:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर शासनाने ७ जूनपासून सर्वत्र अनलॉक केल्यामुळे बाजारपेठांसह सर्व प्रकारचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर शासनाने ७ जूनपासून सर्वत्र अनलॉक केल्यामुळे बाजारपेठांसह सर्व प्रकारचे उद्योग-व्यवसाय सुरू झाले आहेत. यामुळे खरेदीसाठी सर्वत्र नागरिकांची एकच गर्दी होत आहे; मात्र नागरिकांना देवदर्शनासाठी शासनाने अद्यापही मंदिरे बंदच ठेवली आहेत. त्यामुळे भाविकांचा पूजा-पाठ घरातल्या देवासमोरच सुरू असून, दुसरीकडे मंदिरे बंद असल्यामुळे नागरिकांची विविध पूजा,पाठ व विधी त्यांच्या घरीच करून घेत असल्याचे शहरातील विविध मंदिराचे पुजारी यांनी सांगितले.
सध्या शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त पूजा-पाठसाठी मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. मंदिरात दर्शनासाठी उघडे ठेवण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शहरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर, श्री चिमुकले राम मंदिर, श्री ओंकारेश्वर मंदिर, भवानी माता मंदिर, नवसाला पावणारा गणपती मंदिर आदी मंदिरे बंदच आहेत. ही मंदिरे फक्त सकाळी व सायंकाळच्या पूजा-आरतीसाठी उघडत आहेत. पूजेसाठीही मंदिरात पाच जणांना परवानगी असून, पूजा व आरतीनंतर मंदिरे बंदच ठेवण्यात येत आहेत. तसेच दुर्गापाठ, नवचंडी होम, ग्रहशांती आदी धार्मिक विधी हे संबंधित नागरिकांच्या घरीच करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
कोरोनामुळे शासनाने मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली नसल्यामुळे, फक्त पूजा व आरतीसाठी मंदिर उघडले जाते. मंदिरात धार्मिक विधीही करण्यास बंदी असल्यामुळे हे विधी नागरिकांच्या घरीच केले जात आहेत.
महेश त्रिपाठी, पुजारी, भवानी माता मंदिर, जळगाव