‘आप देव’चे प्रवक्ते संत श्री गुलाम महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:48 PM2017-10-18T16:48:43+5:302017-10-18T16:52:49+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. विश्वास पाटील यांनी ‘आप देव’चे प्रवक्ते संत श्री गुलाम महाराजांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा.
श्री गुलाम महाराज किंवा गुलाम भगवान या नावाने एक थोर आदिवासी सत्पुरुष होऊन गेले. नंदुरबार जिल्हय़ातील तळोद्यानजीक मोरगाव (रंजनपूर) या छोटय़ाशा गावात एका भिल्ल कुटुंबात महाराजांचा जन्म झाला. विसाव्या शतकातल्या पहिल्या दशकातला श्री गुलाम महाराजांचा जन्म सांगता येईल. घरची परिस्थिती बेताची. वडील सालगडय़ाचे काम करत असत. त्यांच्या वडिलांचे नाव भावल्या आणि आईचे नाव मैनाबाई होते. मारुती आणि तुळशीला पाणी घालत. महाराजांनी सूर्योपासना केली. निसर्गपूजा बांधली. सूर्यदर्शन केल्याशिवाय ते अन्नाला स्पर्श करत नसत. एका लाकडी फळीवर काही गूढार्थपर मजकूर त्यांनी लिहवून घेतला होता. त्या मजकुराला ते आपल्या अंतर्यामी वसणा:या विचारदेवतेचे प्रतिबिंब मानत असत. दैवत मानत. पूजन करत. वारकरी निष्ठेने महाराजांनी पायी वारी केली. त्यांच्या निष्ठासंपन्न आयुष्याचा परिसराला अभिमान वाटायचा. मोजकेच बोलणे, विनयशीलता आणि स्वावलंबनामुळे त्यांचा प्रभाव पडायचा. जनमनात त्यांच्याबद्दल आदर आणि खोलवर विश्वासाची भावना होती. गुला महाराजांना ईश्वरी साक्षात्कारसंपन्न साधूसारख्या अमोघ वाणीचे वरदान लाभले होते. ‘र्सव खल्विदं ब्रrा’ या घटा-घटात रमणा:या रामरुपाच्या दर्शनाचा त्यांनी सदैव आग्रह धरला. जनभाषेत या तत्त्वचिंतनाला त्यांनी ‘आप देव’ या नावाने संबोधित केले. ‘आप’ याचा अर्थ ‘जनता जनार्दन’ होय. आपण सारी भगवंताची लेकरे हा भाव यातून उदयाला आला. आपण सर्वजण ‘आप’चे म्हणजे ‘जनार्दनाचे’ म्हणजे ‘जनता जनार्दनाचे’ गुलाम आहोत हे प्रकट करण्यासाठी ते स्वत:ला ‘गुलाम भगवान’ म्हणवून घेऊ लागले. गुला महाराजांच्या जीवनात आत्मज्ञानामुळे अभिनव प्रकाश पसरला होता. आत्मज्ञानाशिवाय विद्वत्तेचा उपयोग तरी काय? समाज पुरुषाच्या उद्धारासाठी ते कटिबध्द झाले. हे पूजन गीता समर्थित ‘लोक महेश्वराचे’ होते. महाराजांनी वैवाहिक संबंधातील पावित्र्य जपण्याचा सल्ला दिला. व्यसनमुक्तीची दिशा दिली. अहिंसक जीवनसरणी शिकवली. यामुळे आदिवासी जनांची बचत वाढली. स्वच्छता नांदली. स्वावलंबन जागले. समाजाचे शुचिर्भूत रूप घडविण्याकामी त्यांनी श्वास वेचले. उच्च-नीचतेचा डोलारा यामुळे कोसळला. विषमतेच्या विषारी झळा मंदावल्या. माणसा-माणसात समतेचा दीप प्रज्वलित केला. भेदाभेदाला मूठमाती दिली गेली. परस्पर आदर आणि सन्माननीय वातावरणाचा नादघोष सजला. समतेचे वातावरण उभारले गेले. आप मूल धर्मात दैनंदिन जीवनातल्या सुधारणेला मोल होते. कर्मकांडमुक्त कर्मयोगी जीवनाचा पथ यामुळे प्रशस्त झाला. भक्ती हा पूजापाठाचा विषय न रहाता जगण्याची शैली बनली. यात कुठल्याही देव-देवतांच्या पूजे-अर्चेचे स्तोम नव्हते. मूर्तिपूजेचा आग्रह नव्हता. भगत वा पुजा:यांची मध्यस्थी नव्हती. भोंदू भक्तांची रीघ नव्हती. महाराजांनी परस्पर अभिवादनाची गुढी उभारली. आपण एकमेकांना भेटल्यावर म्हणतो ‘राम राम’. तू राम आणि मीही रामच, अशी यात भावना असते. गुला महाराजांनी नवा संदेश दिला. नमस्कार करताना आपले दोन्ही हात वर उंचावून ‘आप की जय’ असा जयघोष करायचा पाठ दिला. स्त्री असो वा पुरुष दोघांसाठी परस्पर भेटीप्रसंगी योजिलेले हे अभिवादनपर संबोधन सामाजिक समरसतेच्या दिशेने उचललेले क्रांतीकारी पाऊल होते. महाराजांच्या दर्शनासाठी अठरापगड लोक जमत. गुजरातेतल्या सुरत जिल्हय़ातील आताच्या तापी जिल्हय़ातील वालोड तालुक्यातील वेडछी गावी आदिवासींची मोठी परिषद भरली होती. त्या काळी आदिवासींना ‘काळी परज’ म्हणजे ‘काळी प्रजा’ असे संबोधून हिणवले जाई. गांधीजींनी याऐवजी ‘राणी परज’ म्हणून ‘राणीची प्रजा’ या शब्दाचा आग्रह धरला होता. या परिषदेत गांधीजींच्या कुटीनजीक गुला महाराजांची कुटी असल्याचा उल्लेख मिळतो. यातून त्यांच्या राजकीय जागरणाचा परिचय घडतो. गांधीजींच्या चळवळीत उभा देश सामील झाला होता, ‘आप श्री गुला महाराज’ या ग्रंथाचे लेखक शंकर विनायक ठकार नोंदवतात, ‘राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीचा त्या काळात सर्वत्र बोलबाला झाला होता. आदिवासी क्षेत्रातही चळवळीचे वारे पोहोचले होते. 1936 सालच्या फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनाला गुला महाराज पायी चालत गेले होते.’ गुलाम महाराजांची ही देशसेवा होती. देव आणि देश या दोन तत्त्वावर त्यांनी समरसून प्रीत केली.