आधी शहराचा विकास करा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:50+5:302021-03-01T04:17:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव शहराची जी दुर्दशा झाली आहे. ती पाहता जळगाव शहर हे ...

Develop the city first and then consider the boundaries | आधी शहराचा विकास करा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार करा

आधी शहराचा विकास करा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव शहराची जी दुर्दशा झाली आहे. ती पाहता जळगाव शहर हे एका खेडेगाव प्रमाणेच भासत आहे. अशा परिस्थितीत म.न.पा हद्दीमध्ये इतर गावांचा समावेश करणे, म्हणजे त्या गावांना विकासापासून दूर ठेवणे असेच आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांनी आधी जळगाव शहराचा विकास करावा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार त्यांनी करावा. मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव हा रद्द करावा अन्यथा महापालिकेसमोर आमरण उपोषण पुकारू असा इशारा देत आव्हाणे ग्रामस्थांनी मनपा हद्दीत समावेश करण्याचा सत्ताधार्‍यांच्या ठरावाला विरोध केला आहे.

शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने आव्हाणे, मोहाडी, सावखेडा, कुसुंबा व मण्यारखेडा या पाच गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर केला. या ठरावाला शिवसेना व एमआयएम ने विरोध केला मात्र तरीही हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता या ठरावानंतर ज्या गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याचा विचार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्या गावांचा ग्रामस्थांकडून व ग्रामपंचायत प्रशासनाकडून देखील विरोध होताना दिसून येत आहे. आव्हाणे येथील ग्रामस्थांनी याबाबत राज्य शासनाकडे देखील जाण्याची तयारी दर्शवली आहे.

नगर विकास मंत्र्यांना देणार निवेदन

महापालिकेने केलेला ठरावानुसार हा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान हा ठराव जर मनपा सत्ताधाऱ्यांनी रद्द केला नाही. तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील निवेदन देण्यात येणार येइल. आव्हाणे गाव मनपा हद्दीत घेण्यात येऊ नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती आव्हाणे गावचे रहिवासी तथा अंबरनाथ नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे. याबाबत सोमवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी काही ग्रामस्थ देखील उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी आव्हाणे ग्रामस्थांकडून महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनादेखील निवेदन दिले जाणार आहे. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची देखील ग्रामस्थ भेट घेणार आहेत.

कोट

मनपाने केलेला ठरावाला आमचा विरोध असून, ठराव करण्यासाठी दिलेले कारण देखील चुकीचे आहे. ग्रामपंचायत आव्हाणे गावाचा विकास करण्यात पूर्ण सक्षम असून, मनपाने हद्दवाढ करताना आव्हाणे गावाचा विचार सोडून द्यावा.

- भारती पाटील, सरपंच आव्हाणे

आव्हाणे गावाचा विकास जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत आहे. अशा परिस्थितीत जळगाव शहराच्या हद्दीत आव्हाणे गावाचा समावेश करणे चुकीचे आहे. या ठरावाला आमचा विरोध असून मनपाने हा ठराव रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.

-ॲड.हर्षल चौधरी,पंचायत समिती, सदस्य

मनपाने केलेल्या ठरावाला ग्रामस्थ आमचा विरोध आहे. जळगाव शहराचा विकास झाला नसताना परिसरातील गावांच्या विकासाबाबत मनपातील सत्ताधार्‍यांनी दावाच करणे चुकीचा आहे. आव्हाणे गावाचा विकास हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

- मनीषा पाटील, ग्रामपंचायत सदस्या

जळगाव शहरातील समस्या मोठ्या प्रमाणात असताना त्या समस्या न सोडविता इतर गावांचा विचार करणे म्हणजे हास्यास्पद आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणार.

- विजय दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य.

Web Title: Develop the city first and then consider the boundaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.