सिंचन, महामार्ग, रेल्वे यांचे जाळे विणून विकास साधणार - खासदार उन्मेष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:05 AM2019-06-03T00:05:16+5:302019-06-03T00:05:35+5:30

‘लोकमत’ला दिलेल्या सदीच्छा भेटीत मांडले विकासाचे ‘व्हिजन’

To develop the network of irrigation | सिंचन, महामार्ग, रेल्वे यांचे जाळे विणून विकास साधणार - खासदार उन्मेष पाटील

सिंचन, महामार्ग, रेल्वे यांचे जाळे विणून विकास साधणार - खासदार उन्मेष पाटील

Next

जळगाव : जिल्ह्यातील शेळगाव, पाडळसरे, पद्मालय प्रकल्पासह सात बंधाऱ्यांसाठी थेट निधी मिळविण्याकरिता पाठपुरावा सुरु आहे. जिल्ह्यात सिंचन, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे यांचे जाळे विणून मतदार संघाचा विकास साधण्याचा मनोदय जळगाव लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’ भेटीत व्यक्त केला.
खासदार म्हणून निवड झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी जळगाव येथे ‘लोकमत’ कार्यालयाला रविवार, २ जून रोजी सदीच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, नवीन संकल्प यासह विविध मुद्यांवर चर्चा करीत विकासाचे ‘व्हिजन’ही मांडले. त्यांच्यासोबत भाजपचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, पं.स. समिती सदस्य सुनील पाटील, भाजप तालुका विस्तारक गिरीश बºहाटे, अर्जुन परदेशी उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी खासदार उन्मेष पाटील यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....
प्रश्न - वेगवेगळे आरोप झाले तरी भाजपला पुन्हा बहुमत मिळण्याचे कारण काय वाटते ?
उत्तर - भाजप सरकारने सर्व घटकांना सोबत घेऊन पाच वर्षे काम केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे सुरक्षित राष्ट्र ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात रुजली, या दोन घटकांमुळे भाजपला पुन्हा सत्ता मिळाली. मलादेखील उशिरा उमेदवारी जाहीर झाली तरी कोणतीही अडचण न येऊ देता ती ‘पॉवर’ म्हणून स्वीकारली व सर्वांच्या सहकार्याने विजयश्री खेचून आणली.
प्रश्न - खासदार म्हणून आपला काय संकल्प आहे ?
उत्तर - खासदार म्हणून भारावून न जाता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे याला आपले प्राधान्य आहे. त्यादृष्टीने १५ दिवसपूर्वीच धोरण ठरवून कामाला लागलो. यात कोणत्याही भागाचा विकास साधायचा असेल तर तेथे पुरेसे पाणी, रस्ते, रेल्वे मार्गासह हवाई वाहतुकीची सुविधा असल्यास त्या भागाचा हमखास विकास होतो. त्यासाठी जळगाव शहरासह मतदार संघातील सिंचन, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग व हवाई वाहतूक या विषयीचे सर्व प्रश्न मार्गी लावणे हा आपला पहिला संकल्प आहे.
प्रश्न - रखडलेल्या प्रकल्पांबाबत काय उपाययोजना करणार?
उत्तर - रखडलेले प्रकल्प व इतर कामे पूर्ण करण्याची मला संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. यात पायाभूत सुविधा देण्यावर आपला भर असल्याने जळगावपासून ते धुळे, औरंगाबाद, चांदवड या सर्व रस्त्यांची स्थिती पाहता जळगावात कोणी गुंतवणूकदार येणार नाही. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत चाळीसगाव-धुळे रेल्वे, जळगाव ते मनमाड, जळगाव ते भुसावळ रेल्वे मार्ग यांचे काम लवकर मार्गी लावल्यास येथे गुंतवणूकदार येतील व या भागाचा विकास होऊ शकेल. यासाठी २४ महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रश्न - जळगाव शहरातील प्रश्नांबाबत काय धोरण ठरविले आहे?
उत्तर - जळगाव शहर हे खान्देशचे नाक असून त्याच शहराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मनपाच्या हुडको कर्जाच्या बाबतीत पाठपुरावा करीत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे. कराचा पैसा विकासासाठी वापरला गेला पाहिजे, मात्र तसे होत नसल्याने हा प्रश्न मार्गी लावून कराचा पैसा विकासासाठी वापरात यावा यासाठीही आपण सहकार्य करू. येथील अमृत योजना, घनकचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती यांचे मास्टर प्लॅन असून जळगावला गेल्या ३० ते ४० वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा २० महिन्यात निधी आला. आता गरज आहे ती अंमलबजावणीची. या सोबतच सामाजिक, सांस्कृतिक ठेवा जपण्यावरही आपला भर राहणार आहे.
प्रश्न - जळगावात खासदारांचे कार्यालय नसल्याने संपर्क तुटला आहे, असे वाटत नाही का?
उत्तर - हो, हा मुद्दा बरोबर आहे. पूर्वी खासदार येथे वेळ द्यायचे. आपणही येथे पुढील महिन्यापासून संपर्क कार्यालय सुरू करणार असून त्यासाठी जागाही पाहिली आहे. आपले कार्यालय प्रभावी राहणार असून आपण स्वत: तेथे वेळ देणार आहोत.
प्रश्न - जळगावाचा विमानसेवेचा प्रश्न कसा मार्गी लागू शकतो?
उत्तर - विमानसेवेसंदर्भात ६ जून रोजी बैठक ठेवली असून त्यात सर्व समस्या, अडचणी मांडणार आहे. येथून केवळ प्रवासी वाहतूकच नाही तर मालाचीही हवाई वाहतूक सुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी हवाई वाहतूक कंपन्यांशी चर्चा करून अडचणी दूर करू. सोबतच ‘नाईट लॅण्डींग’चा मुद्दाही महत्त्वाचा असून नियमित हवाई सेवा सुरू झाल्यास उद्योग वाढीलाही चालना मिळू शकेल,यासाठीआपण पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत.
प्रश्न - रेल्वे मार्ग होतील, मात्र मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द होण्यावर कसे नियंत्रण येऊ शकेल ?
उत्तर - या पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ती रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होतात, हे मान्य आहे. मात्र ब्रिटीश राजवटीनंतर मनमाड-जळगाव वाढीव रेल्वे मार्गाचे काम मोदी सरकारच्या काळात सुरू झाले आहे. या कामामुळेच रेल्वे रद्द होते. या कामानंतर प्रत्येक तासाला कनेक्टीव्हिटी राहणार आहे. तरीदेखील पॅसेंजर नियमित करण्यासाठी पाठपुरावा करू.
समांतर रस्त्यासाठी केवळ वर्क आॅर्डर मिळणे बाकी
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासह जळगावातील समांतर रस्त्याचेही काम महत्त्वाचे असून त्यासाठी निधीदेखील मिळाला आहे. आता केवळ कार्यादेश (वर्क आॅर्डर) देणे बाकी आहे. ते मिळाल्यानंतर कामास सुरुवात होऊ शकेल, अशी माहितीदेखील खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
मला घडविणारा ‘लोकमत’च शिल्पकार
‘लोकमत’शी आपले सुरुवातीपासूनच ऋणानुबंध असून मला घडविण्यात ‘लोकमत’चे मोठे योगदान राहिले आहे, असे सुरुवातीलाच खासदार उन्मेष पाटील म्हणाले. राजकारणात येण्यापूर्वीच ‘लोकमत’ अनेक कार्यक्रमातून मला संधी मिळाली व मी घडत गेलो. त्यामुळे मला घडविण्यात ‘लोकमत’च खरा शिल्पकार आहे, असे प्रांजळ मतही त्यांनी व्यक्त करीत ‘लोकमत’ सोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला. माझ्या जडणघडणीत ‘लोकमत’च्या योगदानाचा उल्लेख जळगाव जनता बँकेच्या वार्षिक सभेतदेखील करण्यात आला, अशी माहिती खुद्द खासदार पाटील यांनी दिली.

Web Title: To develop the network of irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव