बर्फवृष्टी व वादळाचा तडाखा, जळगाव जिल्ह्यातील भाविक केदारनाथाच्या दर्शनापासून भाविक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:27 PM2018-05-11T13:27:12+5:302018-05-11T13:27:12+5:30
जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक मात्र सुरक्षित
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ११ - उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या जिल्ह्यातील भाविक व पर्यटकांचा दौरा विस्कळीत झाला असून वादळामुळे भाविकांचे केदारनाथाचे दर्शन होऊ शकले नाही. मात्र जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती टूर कंपन्यांनी दिली.
दरवर्षी मे ते आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यातील हजारो भाविक चारधाम यात्रेसह काश्मीरात पर्यटनास व दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार यंदाही हा हंगाम जोरात सुरू असून जिल्ह्यातून भाविक चारधाम यात्रेला गेलेले आहे. मात्र उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे रस्ते बंद झाल्याने जिल्ह्यात काहीसे चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता सर्व भाविक, पर्यटक सुरक्षित आहेत. मात्र यात्रा काहीसी विस्कळीत झाली.
सहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथ
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या जिल्ह्यातील भाविकांपैकी काही भाविक केदारनाथला जात असताना केदारनाथ मंदिर केवळ सहा कि.मी. अंतरावर राहिले व रस्ता बंद झाला आणि प्रशासनाने भाविकांना परत पाठवित सुरक्षित ठिकाणी मुक्कामी ठेवले. थोड्याच अंतरावर मंदिर असताना दर्शन न झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला.
पहेलगाम जाण्यास रोखले
चारधामसह काश्मीरातही पर्यटक गेले असून काश्मीरात तामिळनाडूतील एका पर्यटकाच्या हत्येनंतर काहीसे वातावरण गंभीर होऊन सध्या तेथे परिणाम जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यातीलही काही पर्यटक काश्मीरात पैलगामला जात असताना त्यांना तेथे रोखण्यात आले. मात्र श्रीनगर येथे सहज जाता येत असल्याचे काही जणांनी सांगितले.
दौरा थांबविला
एका टूर कंपनीकडून ३२ भाविकांचा गट १५ मे रोजी चारधाम यात्रेसाठी जाणार होता. मात्र सध्याची स्थिती पाहता हा दौरा थांबविला असल्याची माहिती टूर कंपनीने दिली. या कंपनीकडून जूनमध्येही आरक्षण असून ते रद्द सध्यातरी होणार असल्याचे चित्र असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
अनेक जाण्यास तयार
सध्या सुट्यांमुळे काश्मीर, उत्तराखंडकडे जाणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण असून वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. त्यामुळे आता जे दौरे ठरले आहे, ते रद्द न करता अथवा न थांबविता ते होणारच असल्याचे काही कंपन्यांनी सांगितले. यामध्ये पर्यटकच उत्सुक असून काश्मीरात जाण्यास त्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार १४ मे रोजी एक गट जाणार आहे.
जिल्ह्यातून उत्तराखंड व काश्मीरात भाविक व पर्यटक गेले असून ते सर्व सुरक्षित आहेत. रस्ता बंद झाल्याने काही भाविकांचे केदारनाथचे दर्शन होऊ शकले नाही.
- लक्ष्मण अमृतकर, ट्रॅव्हेल्स संचालक.
उत्तराखंडातील वातावरणामुळे १५ रोजी जाणारा गट थांबला आहे. मात्र सध्या पर्यटकांना तेथे काही अडचण येत नाही.
- मनीष जोशी, ट्रॅव्हेल्स संचालक.