खास जिलेबी खाण्यासाठी कुटुंबासह येतात या यात्रेत भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:09 PM2017-12-06T16:09:08+5:302017-12-06T16:39:43+5:30
जळगाव जिल्ह्यातील सायगावच्या यात्रेत रंगणार लोकनाट्याची जुगलबंदी
गोकुळ मंडळ/ आॅनलाईन लोकमत
सायगाव, ता.चाळीसगाव, दि.६ : यात्रा म्हटली म्हणजे धम्मालमस्ती. प्रत्येक यात्रेचे एक वैशिष्ट्य असते. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे दत्तजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या यात्रेत मिळणारी जिलेबी ही विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध असल्याने भाविक याठिकाणी जिलेबी खाण्यासाठी कुटुंबासह येत असतात. पंधरा दिवस चालणाºया यात्रेत प्रत्येक दिवशी लोकनाट्याची जुगलबंदी रंगणार आहे.
सायगाव येथे दत्तजयंतीनिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्याच्या सिमेवर असणाºया सायगावात यात्रेसाठी दोन्ही जिल्ह्यातून भाविक येत असतात. चाळीसगाव तालुक्यात महानुभव पंथीय भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे श्री दत्ताच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
सायगाव यात्रेतील जिलेबीची चवच न्यारी
सायगावच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मिळणारी विशिष्ट चव असलेली जिलेबी. जिलेबीची विक्री करणारे अनेक कारागिर या निमित्त यात्रेत दाखल होत असतात. गुळाच्या जिलेबीला साखरेच्या जिलेबीपेक्षा जास्त मागणी आहे. सध्या १०० रुपये किलो दराने यात्रेत जिलेबीची विक्री होत आहे. कुटुंबासह यात्रेत आलेली भाविक जिलेबीचा आस्वाद घेत आहेत.
यात्रोत्सवात लोकनाट्याची जुगलबंदी
फोर-जी, एच.डी. च्या जमान्यात आजही ग्रामीण भागात पारंपारिक लोककला तसेच लोकनाट्याला प्रतिसाद असतो. नागरिकांच्या दरवर्षाच्या प्रतिसादामुळे याठिकाणी एक दोन नव्हे तर चक्क पाच लोकनाट्यांचे आयोजन केले आहे. सायगावच्या यात्रेत जिलेबीसोबत भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्याची जुगलबंदी रंगणार आहे. बुधवार ६ डिसेंबर रोजी मंगला बनसोडे, ८ डिसेंबर रोजी मालती इनामदार, १० डिसेंबर रोजी हरिभाऊ बढे, १२ डिसेंबर रोजी रघुवीर खेडकर तर १५ डिसेंबर रोजी दिलीप काटे यांच्या लोकनाट्याचे आयोजन केले आहे. परिसरातील तरुण व भाविकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असते.
यात्रेवर पावसाचे सावट
ओखी वादळामुळे सध्या पावसाचे सावट आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र शनिवार व रविवारी भाविकांची सर्वाधिक वर्दळ राहणार आहे. या दिवशी सुटी असल्याने नोकरदार तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणात यात्रेत कुटुंबासह सहभागी होत असतात.