भक्तीवीण शब्द ज्ञान... व्यर्थ अवघ ते जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 04:38 PM2019-03-17T16:38:04+5:302019-03-17T16:39:23+5:30

प्रत्येक जीवाची धावपळ ही सुख मिळविण्यासाठी आहे

Devotional words can be understood ... in vain | भक्तीवीण शब्द ज्ञान... व्यर्थ अवघ ते जाण

भक्तीवीण शब्द ज्ञान... व्यर्थ अवघ ते जाण

Next

आजच्या या विज्ञान युगात सर्वच बाबी विकत मिळू शकतात. सर्व धावपळ ही मिळविण्यासाठी आहे आणि या सर्व धावपळीतून काय मिळणार तर उत्तर मिळत नाही, नुसतीच सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नुसतीच धावपळ. प्रत्येक जीवाची धावपळ ही सुख मिळविण्यासाठी आहे. सुखाची व्याख्या ही जीवापरत्वे कदाचित वेगवेगळी असेल. या महाराष्टÑातील थोर संतांंनी मात्र सुखाची किंवा सुखी होण्याची व्याख्या आगळीवेगळीच केली आहे. संत तुकारामांंना कोणीतरी विचारलं, ‘महाराज तुम्ही सुखी कधी असता’, त्यावर तुकोबांनी खालील अभंग सांगितला.
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल मुखी ।।
याबाबत अशीही कथा आहे की, शिवाजी महाराजांंनी काही वित्त-धन वगैरे संत तुकोबांकडे पाठविले होते, त्यावेळीच हे उद्गार तुकोबांच्या मुखातून बाहेर आले.
तुुमचे येरं वित्त धन। ते मज मृत्तीके समान ।।
हिरे-मोती, धन, यांना मातीसमान समजणारे संत फक्त खरे संत असतात, हे तुकोबांनी स्वानुभवातुन सिद्ध केले. तत्वज्ञान हे नुसते जगाला सांगण्यासाठी नसतं तर स्वत: अनुभवातून तत्वे निर्माण केली जातात, अशीच तत्वे चिरकाल टिकतात. तुकोबांच्या या तत्वांनाच अभंग म्हणतात, आणि हे कधीही भंगत नाही. चिरकाल आहेत.
वारकरी संतांनी भक्ती व्यतिरिक्त ज्ञानाला महत्व दिलेले नाही. संत नामदेव महाराज म्हणतात,
भक्त विठोबांचे भोळे । त्यांचे पायी ज्ञान लोळे ।।१।।
भक्तीविण शब्द ज्ञान । व्यर्थ अवघे ते जाण ।। २।।
नाही ज्याचे चित्ती भक्ती । जळो तयाची व्युत्पत्ती ।। ३।।
महाराष्टÑातील वारकरी परंपरेतील संतांचं आराध्य दैवत श्रीविठ्ठल. त्याच्या नामाशिवाय सुख नाही. मुखात श्री विठ्ठलाचे नाम हेच आमचे सुख । हे सर्व संतांनी सांगितले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज हे योगी असून देखील ते म्हणतात. नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
नामावर आधारित वारकरी सांप्रदाय आहे आणि संतांंनी यावर विविध दाखले देवून सिद्ध केले आहे की, श्रीविठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. संत तुकोबांनी तर स्पष्ट सांगितले आहे.
अठरा पुराणांचे पोटी । नामाविण नाही गोठी ।।
आणि नाम हेच साध्य व साधन आहे, तसेच सकळ, मंगल व निधी हे देखील श्री विठ्ठलाचे नाम आहे.
सकळ मंगळ निधी । श्री विठ्ठलाचे नाम आधी ।।
-संत ज्ञानेश्वर
श्री विठ्ठलाचे नाम मुखात सतत येणे हेच सुख आहे आणि हेच वारकरी संतांचं विशेषत्व आहे.
- डॉ.कैलास पाटील, पिंपळेसीम, ता.धरणगाव

Web Title: Devotional words can be understood ... in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.