धरणगाव नगराध्यक्ष तर भुसावळ, भडगाव पालिका सदस्य पदासाठी २९ डिसेंबर रोजी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:03 PM2019-11-30T13:03:32+5:302019-11-30T13:05:34+5:30
३० डिसेंबर रोजी निकाल
जळगाव - जिल्ह्यातील धरणगाव, भुसावळ आणि भडगाव नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या पदासाठी २९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये धरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तर भुसावळ व भडगाव नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी ही पोट निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यातील धरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सलीम पटेल यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे हे पद रिक्त होते. तसेच भुसावळ आणि भडगाव नगरपरिषदेतील प्रत्येकी एक सदस्यांची जागा रिक्त आहे. या तीनही रिक्त पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात ४ ते १२ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. १३ डिसेंबर रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. १८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांकडे अपील करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर २९ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ३० रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.