चोपडा तालुक्यातील धानोरा पेटले, एकाच दिवशी २४ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:50 PM2020-08-16T21:50:34+5:302020-08-16T21:51:47+5:30
धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वॅब घेणे सुरू झाले असल्याने १६ रोजी ६५ रुग्णांचा स्वॅब घेतला. त्यापैकी २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने धानोरा सह परिसरात घबराहट निर्माण झाली आहे.
संजय सोनवणे
चोपडा, जि.जळगाव : शहर आणि तालुक्यात कोरोना व्हायरस थांबता थांबत नसून त्याचे उग्र रूप दाखवायला त्याने सुरुवात केली असून, तालुक्यात एकाच दिवशी ५० ते १०० रुग्णांपर्यंत संख्या यायला सुरुवात झाली आहे. अर्थात ही संख्या वाढायला कारण म्हणजे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येसुद्धा संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात असल्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली आहे. परंतु असे असले तरी सुरुवातीच्या तीन महिन्यात तालुक्यातील धानोरा येथे एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसताना गेल्या दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. मात्र धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वॅब घेणे सुरू झाले असल्याने १६ रोजी ६५ रुग्णांचा स्वॅब घेतला. त्यापैकी २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने धानोरा सह परिसरात घबराहट निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना चोपडा येथे कोविड रुग्णालयात आणण्यासाठी १०८ रुग्णवाहिका चालकांनी नकार दिला. अर्थात धानोरा येथील १०८ रुग्णवाहिका उल्हास पाटील रुग्णालयात गेली होती, परंतु तिकडून जळगाव येथे सामान्य रुग्णालयातच १०८ रुग्णवाहिकेला थांबवून घेतल्याने धानोरा परिसरात १०८ रुग्णवाहिकेची सेवा मिळू शकत नाही. २४ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णवाहिकेची गरज होती. मात्र चोपडा व इतर परिसरातील १०८ रुग्णवाहिका चालकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला. तेव्हा धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ रुग्णवाहिका चालकाने १६ रुग्णांना दोन फेऱ्यांमधून चोपडा येथील रुग्णालयात पोहोचविले. मात्र २४ पैकी सोळाच रुग्ण आल्याने आठ रुग्णांना स्वत:च्या मोटारसायकलद्वारे चोपडा येथे रुग्णालयात उपचारासाठी यावे लागले. या मोटरासायकल पॉझिटिव रुग्णांच्या नातेवाईकांवर पूर्णपणे सॅनिटायझर करून पुन्हा परत घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर आली, अर्थात असे होत असेल तर दररोज रुग्णांची संख्या तीन आकडीमध्ये यायला लागेल हे नाकारता येणार नाही. म्हणून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला येथे आता रुग्णांची संख्या वाढत असल्याने परत सेवेसाठी पाठवावे, अशी मागणी धानोरा परिसरातून नागरिकांनी केली आहे.