धरम साखला, महावीर जैन व विवेक ठाकरे यांना न्यायालयात हजर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:00+5:302020-12-06T04:17:00+5:30
दुसरीकडे पाच वर्षापासून कारागृहात असलेला प्रमोद रायसोनी याच्यासह १४ संचालकांविरुध्द मंगळवार ८ डिसेंबर रोजी जळगाव न्यायालयात दोषारोपपत्र ठेवले जाणार ...
दुसरीकडे पाच वर्षापासून कारागृहात असलेला प्रमोद रायसोनी याच्यासह १४ संचालकांविरुध्द मंगळवार ८ डिसेंबर रोजी जळगाव न्यायालयात दोषारोपपत्र ठेवले जाणार आहे. शनिवारी न्यायालयात कामकाज झाले नाही, आता ते मंगळवारी होणार आहे.
पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ जणांच्या पथकाने मागील शुक्रवारी बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए सांखला, महावीर जैन यांच्या घरी तसेच कार्यालयांवर एकाचवेळी छापे घातले होते. त्यात या सर्वांची कार्यालये सील करुन महत्वाचे कागदपत्रे, संगणकातील डेटा, हार्ड डीस्क जप्त करण्यात आल्या होत्या. त्याच रात्री चौघांना अटक करुन एक पथक पुण्याला नेण्यात आले होते. त्यानंतर चालकालाही अटक करण्यात आली होती. सर्वांना ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात अवसायक जितेंद्र कंडारे, माहेश्वरी, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर व योगेश साखला यांनाही आरोपी करण्यात आले असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
दोषारोप ठेवण्याचे कामकाज आता ८ रोजी
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमधील अपहार, फसवणूक प्रकरणात अटकेतील संशयित आरोपींवर दोषारोप ठेवण्याचे कामकाज आता ८ डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात शनिवारी कामकाज होणार होते. कारागृहातून व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे कामकाज होणार होते, मात्र ते आता मंगळवार ८ डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बीएचआर खटल्याचे कामकाज थांबले होते. शनिवारपासून त्याची नियमित सुनावणी होणार होती. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.