धरणगाव पोलीस पथकाचा रिकामटेकड्यांवर दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:55+5:302021-05-25T04:18:55+5:30
धरणगाव : येथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली धरणगाव पोलीस स्टेशनने शहरात विनाकारण फिरणाऱ्या विनामास्क व विनापरवाना दुचाकी ...
धरणगाव : येथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली धरणगाव पोलीस स्टेशनने शहरात विनाकारण फिरणाऱ्या विनामास्क व विनापरवाना दुचाकी व चारचाकी चालवणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत दररोज दोनशे ते अडीचशे व्यक्तींवर कारवाई करण्यात येत असून, दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे.
धरणगाव शहरात लाॅकडाऊन काळामध्ये सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत रिकामे फिरणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यासाठी धरणगाव पोलीस स्टेशनने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत स्वतः पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आपल्या पथकाला घेऊन रस्त्यावर उतरले असून, ज्यांच्याकडे कामाचे सबळ कारण नाही, जे विनामास्क दुचाकी व चारचाकीवरून फिरणारे, तसेच ज्यांच्याकडे लायसन्स नाही, अशांकडून दोनशे रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. दिनांक २३ मे रोजी अशा कारवाई केलेल्या व्यक्तींची संख्या २५० होती, तर दिनांक २४ मे रोजी ही संख्या १५० आहे. यामुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण होत असून, लवकरच ही संख्या कमी होईल, त्यामुळे रिकामटेकड्या फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल, असा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये रिकामटेकड्यांची संख्या वाढत होती. जे लोक फिरत होते, त्यापैकी काहींच्या तोंडाला मास्क नव्हते. असे लक्षात आले की, परवाना नसताना अनेकजण दुचाकी व चार चाकी चालवतात म्हणून ही धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. निश्चितच या मोहिमेमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून, कोरोनाची साखळी तोडण्यास याची मदत होईल.
-अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, धरणगाव पोलीस स्टेशन
===Photopath===
240521\24jal_12_24052021_12.jpg
===Caption===
दंडात्मक कारवाई करताना पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, सोबत पोलीस पथक. (आर. डी. महाजन, धरणगाव)