ढील दे ढील दे दे रे भैया, इस पतंग को ढील दे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 09:08 PM2021-01-14T21:08:47+5:302021-01-14T21:08:58+5:30
युवाशक्ती व साई मोरयातर्फे पंतग उत्सव : बच्चे कंपनीचीही धमाल
जळगाव : चली चली रे पतंग, मेरी चली रे.., ढील दे ढील दे दे रे भैया, इस पतंग को ढील दे...अशा चित्रपट गीतांच्या तालावर गुरूवारी जळगावकरांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला. विविध संघटनांतर्फे मोकळ्या मैदानावर पतंग महोत्सवांचे आयोजन केले असल्यामुळे त्याठिकाणी बच्चे कंपनी धम्माल करताना दिसून आली.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी खोटे नगर स्टॉप येथील मोकळ्या मैदानावर युवाशक्ती फाऊंडेशन व साई मोरया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सामान्य नागरिक, तरूण, आबालवृद्ध तसेच लहान मुलांनी पतंग उडवून उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव यांच्यासह उपस्थितांनी पतंग उडवून महोत्सवाचा उत्साह वाढविला. २ हजार २०० पतंग व ८०० चक्री आयोजकांतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
सेल्फी घेण्याचा मोह आवरेना !
विविध चित्रपट गीतांच्या तालावर तरूणांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला. पतंगांची काटाकाटी झाल्यावर एखादी पतंग कटल्यानंतर काटली रे काटली रे चा आवाज दिला जात होता. तसेच अनेकांना पतंग उडविताना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नव्हता. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगत असलेल्या झोपडपट्टीमधील चिमुकल्यांना सुध्दा पतंगी व चक्री वाटप करण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
पतंग उत्सवाच्या यशस्वीतेसाठी संदिप सुर्यवंशी, प्रितम शिंदे, प्रसन्न जाधव, पियुष हसवाल, अजय खरात, पवन चव्हाण, मंथन ईशी, हितेश सुर्यवंशी, प्रशांत वाणी, अर्जुन भारूळे, दिप पाटील, जयेश महाजन, केतन देवराज, अनिल चव्हाण, सुदर्शन ईशी, पराग पाटील, निखील पाटील, अमोल गोपाल, धिरज पाटील, गणेश भोई, मोनू पाटील आदींनी परिश्रम घेतले.
मकर संक्रांत, पोंगल आणि लोहडी साजरी
उज्ज्वल स्प्राउटर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरूवारी मराठमोळी मकर संक्रांत, दक्षिणात्य पोंगल तसेच उत्तरभारतीय लोहडी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तिळगुळचे लाडू व तांदळाचा गोड तसेच तिखट पोंगल हा पदार्थ कसा बनवावा हे शिक्षकांनी प्रात्यक्षिकद्वारे ऑनलाइन करून दाखविले. तसेच पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तर भारतात प्रसिद्ध असलेली तील आणि गुळाची चिक्कीख पापडी बनवून दाखविली, सर्व विद्यार्थ्यांनी नंतर शिक्षकांनी प्रात्यक्षिक दाखविल्याप्रमाणे सदर पदार्थ घरी बनवून त्या पदार्थांचे फोटो शिक्षकाना पाठविले़ यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी भदादे तसेच संस्थेच्या अध्यक्षा अनघा गगडाणी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.