जळगावात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरून भोईटे-पाटील गटात धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 08:11 PM2018-06-19T20:11:04+5:302018-06-19T20:11:04+5:30
दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक
जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्था अर्थात ‘मविप्र’चा ताबा घेण्याच्या कारणावरुन भोईटे व नरेंद्र पाटील गटात सुरु असलेला वाद मंगळवारी जोरदार उफाळून आला. दुपारी चार वाजता दोन्ही गटाकडून एकमेकावर तुफान दगडफेक झाली. त्यात पाच जण जखमी झाले. एका जणाला रस्त्यावर आडवा पाडून १५ ते २० जणांच्या जमावाने लाथाबुक्यांनी प्रचंड मारहाण केली. दरम्यान, प्रचंड जमाव झाल्याने त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
या कारणावरुन उफाळला वाद
तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशाने नरेंद्र पाटील गटाने रविवारी संस्थेचा ताबा घेतला. त्यानंतर सोमवारी तहसीलदारांनी पुन्हा नवीन आदेश काढून जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवर ताबा घेण्याविषयी आपण कोणतेही आदेश दिलेले नसल्याचे त्यात म्हटले आहे. या आदेशाची प्रत जिल्हा पेठ पोलिसांना देण्यात आली. २४ तासात दोन वेगवेगळे आदेश झाल्याने संभ्रमाचे वातावरण झाले. त्यामुळे भोईटे गट मंगळवारी सकाळपासूनच संस्थेच्या आवारात दाखल झाला. भोईटे गटाचे कार्यकर्ते आल्याचे समजताच नरेंद्र पाटील गटाचेही संचालक व कार्यकर्ते महाविद्यालयात दाखल झाले. संभाव्य वाद लक्षात घेता पाटील गटाने संस्थेच्या कार्यालयाला दोन्ही बाजुंनी कुलुप लावले. हा प्रकार समजल्यानंतर भोईटे गटाच्या काही जणांनी मुख्य रस्त्यावरील कार्यालयाच्या दरवाजाला सील लावून साखळदंडाने दुसरे कुलूप लावले अन् तेथेच वादाची ठिणगी पडली.
दगडफेकीला सुरुवात होताच दोन गट भिडले
न्यायालय रस्त्यावरुन भोईटे गटाच्या एका जणाने संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक केली. हा प्रकार पाहिल्यानंतर बाहेर थांबलेल्या पाटील गटाच्या समर्थकांनीही दगडफेक करायला सुरुवात केली. यावेळी सुनील धोंडू भोईटे (वय ५२) यांना १५ ते २० जणांच्या जमावाने पकडून रस्त्यावर आडवा पाडला, त्यानंतर बुटाच्या लाथांनी जबर मारहाण करायला सुरुवात केली. जमावातील प्रत्येक जण मिळेल त्या पध्दतीने मारहाण करीत होते. त्यानंतर जयेश बाबुराव भोईटे (वय ३२) या तरुणाच्या डोक्यात जबर मार बसल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. अॅड.विजय भास्कर पाटील यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकल्याची माहिती भोईटे याने पत्रकारांना दिली.
सर्वत्र पळापळ अन् दहशतीचे वातावरण
मुख्य रस्त्यावर झालेली दगडफेक व हाणामारी पाहून सर्वत्र पळापळ झाली. परिसरातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. न्यायालय व गणेश कॉलनीकडे जाणारा रस्ता २० मिनिटासाठी बंद झाला होता.