जळगावात २० टक्क्यांनी वाढले धुलीकरणाचे प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:56 PM2018-12-16T17:56:42+5:302018-12-16T17:59:43+5:30
जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, हवेतील धुलीकरणाच्या प्रदूषणात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे
सचिन देव
जळगाव : जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, हवेतील धुलीकरणाच्या प्रदूषणात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या काळात हवेची गुणवत्ता तपासण्यात येत असते. यंदादेखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान हाय व्हाल्यूम ईअर मशिनद्वारे दर आठ तासाला वातावरणातील प्रदुषणाचे नमुने जळगावातील गिरणा पाण्याची टाकी व जुन्या बी. जे. मार्केटच्या इमारतीवर घेण्यात आले. हे नमुने दररोज दुसºया दिवशी प्रदूषण मंडळाच्या नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते.
महिनाभरानंतर नाशिक प्रयोगशाळेतर्फे प्रदूषणाचा अहवाल जळगाव कार्यालयाला प्राप्त झाला आहे. तसेच नाशिक येथील अश्वमेध या खाजगी संस्थेतर्फेही शहरातील तीन ठिकाणी ध्वनीची पातळी मोजण्यात आली होती. मात्र, अश्वमेध संस्थेचा अहवाल अद्याप आलेला नाही.
खराब रस्त्यांमुळे वाढले धुलीकरणाचे प्रमाण
धुलीकरणामुळे प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब रस्ते असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले. खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवेत धुळ पसरत असते व त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्याखालोखाल शहरात सुरु असलेल्या बांधकामांमुळेही धुळीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
दिवाळीच्या काळात १५ दिवस हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता मोजण्यात आली. यामध्ये शहरात कमी प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात कुठलीही वाढ झालेली दिसून आली नाही. मात्र, वातावरण धुलीकरणाचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. तर ध्वनी प्रदूषणाची नोंद नाशिक येथील अश्वमेध संस्थेने घेतली असून,त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.
-सोमनाथ कुरमुडे, उपप्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ