धुळे ‘डिजिटल पॅटर्न’चा झेंडा राज्यात
By admin | Published: February 10, 2017 12:21 AM2017-02-10T00:21:38+5:302017-02-10T00:21:38+5:30
शिक्षण आयुक्तांनीही घेतली दखल : हर्षल विभांडिक यांच्या योगदानाचे कौतुक
धुळे : लोकसहभागातून धुळे जिल्ह्यातील 100 टक्के जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्या आहेत. डिजिटलचा हा पॅटर्न इतर जिल्ह्यातही वापरण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी घेतला आहे. विशेष बाब म्हणजे धुळे जिल्ह्यात हा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे हर्षल विभांडिक इतर जिल्ह्यांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
आदिवासी जिल्ह्याचा आदर्श
धुळ्यासारख्या आदिवासी जिल्ह्याने 1104 जिल्हा परिषद शाळा डिजिटल करून राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच राज्याचे शिक्षण आयुक्त आयुक्त धीरज कुमार यांनी चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील 100 टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी हर्षल विभांडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात लोकसहभागातून 237 कोटी निधी
राज्याने 22 जून 2015 पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमास सुरुवात केली आहे. यात शिक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील 25 हजार 656 शाळा डिजिटल झाल्या आहेत. लोकसहभागातून 237 कोटी निधी उभा राहिला आहे. डिसेंबर 2016 अखेरीस राज्यात 19 हजार 981 प्राथमिक शाळा आणि 6423 उच्च प्राथमिक शाळा प्रगत घोषित झाल्या आहेत, असे शिक्षण आयुक्तांनी म्हटले आहे.
राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांची व डिजिटल शाळांची चळवळ खूप मोठय़ा प्रमाणात उभी राहिली आहे. अनेक केंद्रातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील 100 टक्के शाळा डिजिटल होत आहेत. या शाळांमधून विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने शिकत आहेत.
धुळे जिल्ह्यातील चळवळ
आज धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 100 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामध्ये लोकसहभाग, शिक्षण विभाग यांच्यासोबत हर्षल विभांडिक यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी गेल्या 18 महिन्यात 195 पेक्षा जास्त ग्रामसेवक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या प्रेरणा सभा घेतल्या. याच्या परिणामस्वरूप धुळे जिल्ह्यात डिजिटल वर्गासाठी मोठा लोकसहभाग उभा राहिला आहे.
साडेपाच कोटी लोकसहभाग
धुळे जिल्ह्यातून आतार्पयत 18 महिन्यात लोकसहभाग, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या मदतीने जवळपास साडेपाच कोटी रुपये गोळा झाले. विभांडिक यांनी स्वत:च्या परिश्रमातून 950 पेक्षा जास्त शाळा डिजिटल केल्या. विभांडिक हे न्यूयार्कमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये डिजिटल शाळांसाठी फार मोठे योगदान दिले आहे.
ज्या ठिकाणी वीज पोहचली नाही त्या ठिकाणीही बॅटरीवर व लॅपटॉप, टॅबच्या माध्यमातून जिल्ह्यात डिजिटल शाळा करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रयत्न याबाबत कौतुकास्पद आहेत. हाच आदर्श इतर जिल्ह्यातही निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीत विभांडिकांचे मार्गदर्शन
लोकसभागातून शाळा डिजिटल कशा कराव्यात यासंदर्भात हर्षल विभांडिक हे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. दुर्गम भागातील शाळांसाठी जिल्हास्तरावर 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत मार्गदर्शन करणार आहेत.
10 व 11 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर व राजुरा व ब्रrापुरी या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे. 13 फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यासाठी व 14 फेब्रुवारी रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यासाठी कार्यशाळा होणार आहे.
धुळे जिल्ह्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांची स्थिती
डिजिटलमध्ये पाठीमागे राहिलेल्या जिल्ह्यांची स्थिती धुळेप्रमाणेच आर्थिकदृष्टय़ा मागास आहे. धुळे जिल्ह्यातील 100 टक्के शाळा डिजिटल होण्यासाठी हर्षल विभांडिक यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले याचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी राज्यस्तरावरूनच कार्यशाळा घेण्यासाठी नियोजन देण्यात आले आहे.
या नियोजनानुसार गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व ज्या गावांमधील शाळा डिजिटल झाल्या नाहीत तेथील मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांच्या कार्यशाळा घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील 100 टक्के शाळा डिजिटल होण्यास धुळे पॅटर्नचा नक्कीच मदत होईल, असे राज्याचे शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी म्हटले आहे.