धुळे कारागृहातील रक्षक व हवालदार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2016 12:39 AM2016-02-10T00:39:37+5:302016-02-10T00:39:37+5:30
कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न : उपमहानिरीक्षकांनी केली कारवाई
धुळे : न्यायालयीन कोठडीतील कैद्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहातील हवालदार व तुरुंगरक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अधीक्षक बी.आर. मोरे यांनी दिली. हवालदार पंडित बाळू बोरसे व तुरुंगरक्षक वामन नामदेव देशमुख यांच्यावर ही कारवाई झाली. कारागृह उपमहानिरीक्षक (औरंगाबाद मध्य विभाग) राजेंद्र धामणे यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी दुपारी काढले. दोघांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका प्राथमिक चौकशीत ठेवण्यात आला आहे. कारागृह अधीक्षक बी.आर. मोरे यांनी चौकशी अहवाल उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार हे निलंबनाचे आदेश काढले आहेत. बलात्काराचा आरोपी : बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीतील 21 वषर्ीेय कैदी तुकाराम खामकर याने 5 फेब्रुवारीला सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बॅरेक क्रमांक दोनच्या मागील भागात ही घटना घडली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झाला होता. तुकाराम खामकर यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल भादंवि कलम 376, 305 गुन्ह्यात 25 ऑक्टोबर 2015 रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती. 2 नोव्हेंबर 2015 रोजी त्याला जिल्हा कारागृहात दाखल केले होते.