धुळे, नंदुरबारचे आव्हान भाजपाला पेलवेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 07:18 PM2018-08-20T19:18:51+5:302018-08-20T19:24:21+5:30

धुळे, नंदुरबार हा आदिवासी बहुल भाग काँग्रेसचा भरभक्कम गड राहिला आहे. पूर्वी त्याला धडका देऊनही फारसे यश आले नव्हते. ‘आयारामां’ना घेऊन भाजपाने यशाची चव चाखली आहे. आता जि.प., पं.स. व मनपात ही जादू चालेल काय?

Dhule, Nandurbar challenge to BJP? | धुळे, नंदुरबारचे आव्हान भाजपाला पेलवेल?

धुळे, नंदुरबारचे आव्हान भाजपाला पेलवेल?

Next
ठळक मुद्देदोन खासदार, चार आमदार, चार पालिकांमध्ये भाजपाने यश मिळविले आहे.भाजपाने या दोन्ही जिल्ह्यात दीर्घकाळ संघर्ष केलाभाजपा यशाची पताका कायम ठेवतो काय, याची उत्सुकता

दोन खासदार, चार आमदार, चार पालिकांमध्ये भाजपाने यश मिळविले आहे. या यशाने भाजपाचा हुरुप वाढविला असला तरी ‘आयाराम’ विरुध्द निष्ठावंत असा नवा सामना रंगला आहे. खासदार डॉ.हिना गावीत विरुध्द आमदार उदेसिंग पाडवी, केंद्रीय संरक्षणराज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल विरुध्द आमदार अनिल गोटे यांच्यात जाहीर मतभेदांच्या फुलबाज्या नेहमी उडत असतात. गिरीश महाजनांकडे धुळे महापालिकेची जबाबदारी दिली गेली आहे. ‘जळगाव पॅटर्न’चा त्यांचा प्रयत्न यशस्वी होतो काय?, याची उत्तरे काळाच्या उदरात दडलेली आहेत.
डॉ.हीना गावीत, डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.सुभाष भामरे, अनिल गोटे, मोतीलाल पाटील, रजनी अनिल वानखेडे यांनी ऐन निवडणुकीच्यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला आणि यश मिळविले. जयकुमार रावल यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसी असून पहिली निवडणूक अपक्ष आमदार म्हणून ते जिंकले होते. नगराध्यक्षपद कुटुंबात आईकडे आहे. उदेसिंग पाडवी यांनी सेनेकडून एकदा निवडणूक लढवली होती. अजय परदेशी यांना उमेदवारी दिल्याने डॉ.शशिकांत वाणी नाराज होते. पक्षांतर्गत सारेच आलबेल नाही.
दीर्घकाळ संघर्ष
भाजपाने या दोन्ही जिल्ह्यात दीर्घकाळ संघर्ष केला आहे. दिलवरसिंग पाडवी, उत्तमराव पाटील, डॉ.नरेंद्र पाडवी, डॉ.कांतीलाल टाटीया, गोविंदराव चौधरी, लखन भतवाल, डॉ.सुहास नटावदकर या कार्यकर्त्यांनी पक्षाचे जाळे विस्तारले. फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करीत राहिले. उत्तमराव पाटील, दिलवरसिंग पाडवी, चौधरी यांना मंत्रिपदे मिळाली.

संयुक्त धुळे जिल्हा असताना तत्कालीन जनसंघ आणि भाजपा हा अल्पबळ असलेला, तरीही दखलपात्र पक्ष अशी त्याची ओळख होती. आदिवासीबहुल जिल्ह्यात काँग्रेसची प्रचंड ताकद होती. इंदिरा गांधी या कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नंदुरबारपासून करीत असत. एवढा विश्वास त्यांना आदिवासी जनतेविषयी होता. सुरुपसिंग नाईक, माणिकराव गावीत, बटेसिंग रघुवंशी, रोहिदास पाटील, अमरीशभाई पटेल, विजय नवल पाटील, रामरावदादा पाटील, डॉ.हेमंत देशमुख, द.वा.पाटील, डी.एस.अहिरे, चंद्रकांत रघुवंशी, राजवर्धन कदमबांडे यांनी काँग्रेस विचारधारा जिवंत ठेवली. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर मजबूत पकड ठेवली. पुढे काँग्रेसच्या विभाजनानंतर या गडाला धडका बसू लागल्या. धुळे जिल्हा परिषद प्रथमच शिवसेना-भाजपाच्या ताब्यात गेली. धुळे महापालिकेचे महापौरपद अल्पकाळासाठी भाजपाने खेचून घेतले. (त्याची पुनरावृत्ती आता स्थायी समितीच्या सभापतीपदाच्यावेळी झाली.) नवापुरात दिग्गज नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव झाला. नंदुरबार जिल्हा परिषद राष्टÑवादीने खेचली. लोकसभा निवडणुकीत अमरीशभाई पटेल पराभूत झाले. एकसंघ काँग्रेसला कुणी पराभूत करु शकले नसते; पण विभाजनानंतर सगळी समीकरणे बदलली.
२०१४ ची निवडणूक या दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी ठरली. भाजपाने दिल्लीवर झेंडा फडकवायचा या हेतूने पूर्ण मोर्चेबांधणी केली. लोकसभेची नंदुरबारची जागा भाजपा यापूर्वी कधीच जिंकू शकला नव्हता. पण इतिहास बदलायचा या हेतूने भाजपाने तत्कालीन मंत्री व राष्टÑवादीचे नेते डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ.हीना गावीत यांना नंदुरबार तर शिवसेनेचे धुळे विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांना धुळे लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले. माणिकराव गावीत आणि अमरीशभाई पटेल यांच्यासारख्या दिग्गजांना पराभूत करीत हे दोन्ही भाजपा उमेदवार प्रथमच खासदार झाले. डॉ.विजयकुमार गावीत यांची निवडणूक तंत्रावर विलक्षण पकड आहे. नंदुरबार जिल्हा परिषद आणि नवापूर विधानसभा निवडणूक या तंत्राच्या बळावर त्यांनी यापूर्वी जिंकली होती. तर डॉ.भामरे यांना वडील, ज्येष्ठ काँग्रेस नेते रामरावदादा पाटील, माजी मंत्री गोजरताई यांची पुण्याई लाभली. काँग्रेसमधील असंतुष्टांनी भामरे यांना आतुन साथ दिली. पुढे विधानसभा निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत (नंदुरबार), उदेसिंग पाडवी (शहादा-तळोदा), अनिल गोटे (धुळे शहर) व जयकुमार रावल (शिंदखेडा) असे चार आमदार निवडून आले. डॉ.भामरे व रावल यांना अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले. त्यामानाने नंदुरबारला काही मिळाले नाही. पालिका निवडणुकीत मोतीलाल पाटील (शहादा), अजय परदेशी (तळोदा), नयनकुंवर रावल (दोंडाईचा), रजनी वानखेडे (शिंदखेडा) या चार लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या विजयामुळे उदेसिंग पाडवी, जयकुमार रावल यांच्या मतदारसंघावरील पकड अधिक मजबूत झाली.
नंदुरबार जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने नेतृत्वाची पोकळी कायम राहिली. निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये आलेल्या गावीत पिता-कन्येला निष्ठावंत आपले मानायला तयार नाही. उदेसिंग पाडवी, डॉ.शशिकांत वाणी, डॉ.सुहास नटावदकर ही मंडळी नाराजांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. पूर्वी गिरीश महाजन तर आता जयकुमार रावल हे पालकमंत्रिपद भूषवत आहेत. रावल यांच्या नेतृत्वाखाली नवापूर व नंदुरबार पालिकेत भाजपाला यश मिळविता आलेले नाही, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आताही जिल्हा परिषदेची निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची याचा अद्याप निर्णय झालेला नाही. रावल हे नंदुरबारकडे लक्ष देतात की, धुळे जिल्हा परिषदेवर यावर पुढील समीकरणे अवलंबून राहतील. डॉ.विजयकुमार गावीत यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणले होते, त्या अनुभवाच्या बळावर भाजपा त्यांच्याकडे सूत्रे सोपविते काय? या प्रश्नांची उत्तरे नजिकच्या काळात मिळतील.
धुळे जिल्हा परिषदेचे नेतृत्व रावल तर महापालिकेचे नेतृत्व डॉ.भामरे यांच्याकडे दिले जाते काय? जळगाव महापालिका निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना जसे दूर ठेवण्यात आले, तसे अनिल गोटे यांनाही दूर ठेवले जाईल काय? गिरीश महाजन यांच्याकडे प्रभारी जबाबदारी देऊन जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होणार काय? असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. अंतर्गत मतभेदांवर मात करीत भाजपा यशाची पताका कायम ठेवतो काय, याची उत्सुकता राहणार आहे.
काँग्रेस-राष्टÑवादीला बालेकिल्ला सांभाळण्याची ही शेवटची संधी आहे. दोन्ही पक्ष आघाडी करुन जर या निवडणुकीला सामोरे गेले तर भाजपाच्या आव्हानापुढे चांगला टिकाव धरु शकतील, अन्यथा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या या निवडणुकीत जनमानसाचा कौल दोन्ही कॉंग्रेसविरोधात जाऊ शकतो. एवढे सामंजस्य दोन्ही पक्षाचे नेते दाखवतील, अशी अपेक्षा आहे.
- मिलिंद कुळकर्णी

Web Title: Dhule, Nandurbar challenge to BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.