धुळे : साक्री तालुक्यात शेतक-यांची प्रोड्युसर कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 09:00 AM2017-11-04T09:00:08+5:302017-11-04T09:03:37+5:30
पिंपळनेर : साक्री पश्चिम पट्ट्यातील ३५ गावांमधील एक हजार शेतक-यांचा समावेश
विशाल गांगुर्डे /पिंपळनेर - साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ३५ गावांमधील एक हजार शेतकºयांना एकत्रित आणून ‘देशबंधू अॅग्रो रिसोर्स सेंटर प्रोड्युसर कंपनी लि.’ पिंपळनेर येथे स्थापन करण्यात आली आहे. कंपनीने चौथ्या वर्षात पदार्पण केले असून गहु, मका, कांदा, सोयाबीन व भात या मुख्य पिकाचे विक्रमी उत्पादन होत आहे. शेतकरी कंपनीसाठी देशबंधू अॅण्ड मंजु गुप्ता फाउंडेशनने १० लाखाचे बिनव्याजी भांडवल उपलब्ध करुन दिले आहे. अशा पद्धतीने १५ लाख रुपये जमा करुन शेतक-यांनी कंपनी स्थापन केली आहे. यात ११ संचालक असून ३५ गावातील एक हजार शेतकरी सभासद आहेत.
कंपनीच्या अध्यक्षपदी चैत्राम देवचंद पवार तर उपाध्यक्ष संभाजीराव दशरथ काकुस्ते आहेत. प्रत्येक संचालकाकडे १०० सभासद सदस्य आहेत. यांचे कार्य शेतक-यांच्या कृषीविषयक गरजा पूर्ण करणे हे राहणार आहे. सभासदांना या कंपनीच्या माध्यमातून योग्य नफा मिळावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे. एक हजार सभासद कंपनीच्या माध्यमातून शेती करीत असून सुमारे १६०० हेक्टर शेतीवर कंपनीचे नियोजन व नियंत्रण आहे.
३५ गावांमध्ये वेळोवेळी मेळावा, कृषी जलस्त्रोत विकास, पशुसंवर्धन कौशल्य प्रशिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य व शिक्षण या घटकांवर काम करणे राहणार आहे. तसेच शेतीची सर्व तांत्रिक माहिती दिली जाते. ग्रुप फॉर्मिंग (गटशेती), कॉण्ट्रॅक्ट फार्मिंग शेतीचे मार्गदर्शन करून कंपनीच्यावतीने एक हजार शेतकºयांव्यतिरिक्त भात, मका, बियाणे, भाजीपाला, बियाणे, रासायनिक फवारे, खते उपलब्ध करुन देणे, तेही कमी किंमतीत, वर्षभरात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. सभासद शेतक-यांना संपूर्ण कृषी मार्गदर्शन कंपनी करते. यासह शेतीचे सर्व साहित्य हे वाजवी दरात बाजारभावापेक्षा अधिक स्वस्त मिळतात. कंपनी कायदा २०१३ प्रमाणे कंपनीची स्थापना झाली आहे. शेतकºयांना योग्यवेळी योग्य पैसा, नफा मिळावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
इन्फो
१) कंपनी ३ वर्षापासून काम करीत असल्याने सध्या सर्व शेती उत्पादन घेण्यात येते. उत्पादित मालाला मार्केट मिळवून देण्यासाठी यंदा कंपनीने ९६० किलो तांदुळ नांदेडला पाठवला आहे. एक-एक किलोची पॅकिंग करून खरेदीदारांना नमुना म्हणून पाठविण्यात आला आहे. तर काही तांदूळ निर्यातही झाला आहे. यात इंद्रायणी, खुशबू, सुकवेल, बासमती अशा सुवासिक जातींचा समावेश आहे.
२) या कंपनीचे मुख्य पीक भात आहे. एक हजार शेतकºयांना शासनाच्या योजनांची माहिती देणे, पीक पहाणी कार्यक्रम राबविणे, वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन वर्षभराचा आढावा देणे तसेच सध्या कल्याण येथील ‘शॉप फॉर चेंज’ येथे तांदूळ विक्रीसाठी जात आहे. तसेच भाजीपाला उत्पादन घेतले जात आहे.
३) या प्रोड्युसर कंपनीला वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी भेट देत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही भेट दिली होती. सध्या संस्थेचे राज्य समन्वयक रावसाहेब बडे यांचे सहकार्य लाभत आहे.
शेतकरी हिताची त्रिसूत्री
आदिवासी गरजू व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी, त्यांचे जीवनमान उंचावे, तसेच गरजू शेतक-यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे, शेतीला लागणा-या सर्व प्रकारच्या निविष्ठा वेळेवर उत्तम प्रतीच्या व वाजवी दरात उपलब्ध व्हाव्यात, ही त्रिसूत्री घेऊन पश्चिम पट्ट्यातील एक हजार शेतक-यांना एकत्रित आणून प्रत्येकी ५०० रुपये भागभांडवल जमा करण्यात आले.