धुळ्यातील विद्यार्थिनी मदतीसाठी सरसावली, अपघातस्थळी मदतीचा किरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:00 PM2019-12-11T13:00:09+5:302019-12-11T13:00:38+5:30

जखमी चालकही सुखावला

Dhule students rush to help, ray of help at accident site! | धुळ्यातील विद्यार्थिनी मदतीसाठी सरसावली, अपघातस्थळी मदतीचा किरण!

धुळ्यातील विद्यार्थिनी मदतीसाठी सरसावली, अपघातस्थळी मदतीचा किरण!

Next

जळगाव : उभ्या बसवर आदळलेल्या ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले खरे. मात्र १०८ ची सेवा मदतीऐवजी प्रश्नांचाच भडीमार करीत असताना बसमधील एक युवती सरसावली आणि तिने घरचा प्रवास सोडून प्राथमिक उपचार करुन जखमी चालकाच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली.
धुळ्यातील नर्सिंग कॉलेजची किरण तोतडे ही विद्यार्थिनी वर्धा येथील मूळ गावाकडच्या प्रवासाला निघाली होती. मंगळवारी पाच वाजेच्या सुमारास वाहतूक विस्कळीत झाल्याने वाडा-शेगाव ही बस पिंपळकोठानजीक थांबली. मागावून भरधाव वेगात येणारा ट्रक बसवर आदळताच सर्वच प्रवासी भेदरले.
ट्रकचा चालक कॅबीनमध्ये अडकल्याचे लक्षात येताच सर्वच प्रवाशांनी धाव घेतली आणि कॅबीनचे दरवाजे तोडून चालकाला बाहेर काढले. प्रचंड रक्तस्त्राव सुरु असताना १०८ या रुग्णवाहिका सेवेला संपर्क केला. तिथल्या प्रश्नांनी सर्वच वैतागले.
तेव्हा किरण सरसावली आणि तिथे जखमी चालकावर प्राथमिक उपचार केले. चालकाला धीर देत उपचार सुरु केल्यावर प्रवाशांनाही समाधान वाटले. भुसावळहून सात वाजता रेल्वेगाडीने वर्ध्याला जायचे म्हणून तीही काळजीत पडली. तेव्हा एका वयस्क महिलेने तिला धीर दिला.
तू उपचार सुरु ठेव आणि आज रात्री माझ्या घरी मुक्कामाला थांब म्हणून किरणला विनवले. तेव्हा किरणने तिच्या आईला फोनवरुन अपघातकार्याची माहिती दिली आणि सकाळी घरी येईल म्हणून सांगून टाकले.
तेव्हा ती वयस्क महिलाही भारावली आणि किरणच्या पाठीशी उभी राहिली.
४० मिनिटानंतर रुग्णवाहिका आल्यावर जखमी चालकाला हलविण्यात आले. त्यानंतर वाडा-शेगाव बसच्या वाहक-चालकांनी किरणला दुसऱ्या बसने मार्गस्थ केले. तेव्हा सारेच सुखावलेले चेहरे तिच्या मदतकार्याच्या समाधानाने निरोप घेत गेले व सर्वच प्रवाशांनी किरणचे कौतुकही केले.

Web Title: Dhule students rush to help, ray of help at accident site!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव