आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळ्याचा धर्मेश हिरे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 04:57 PM2019-09-27T16:57:22+5:302019-09-27T16:57:37+5:30
शेठ ना.बं.वाचनालयातर्फे आयोजित स्व.प्रा.मंदा व डॉ.श्यामकांत देव स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळे येथील विद्यावर्धिनी सभा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश साहेबराव हिरे हा विद्यार्थी सर्वप्रथम आला.
चाळीसगाव, जि.जळगाव : येथील शेठ ना.बं.वाचनालयातर्फे आयोजित स्व.प्रा.मंदा व डॉ.श्यामकांत देव स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळे येथील विद्यावर्धिनी सभा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश साहेबराव हिरे हा विद्यार्थी सर्वप्रथम आला.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी १० वाजता दीपप्रज्वलनाने झाले. वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ.हेमांगी पूर्णपात्रे, उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी, कार्यवाह प्रा.दीपक शुक्ल, समितीचे निमंत्रक राजेंद्र चिमणपुरे, परीक्षक विश्वास पाडुळसे, डॉ..वैशाली गालापुरे , स्मिता वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षकांचा परिचय संचालक विश्वास देशपांडे यांनी करून दिला तर सकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन संचालक मधुकर कासार यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभासाठी माजी उपप्राचार्य प्रा.व्ही.डी जोशी उपस्थित होते. सुरवातीला राजेंद्र चिमणपुरे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश व वाचनालयाची माहिती दिली. यावेळी परीक्षक राजेंद्र पाडुळसे यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. स्पर्धकातील उणिवा, त्यांचे गुण-दोष इत्यादींबाबत मार्गदर्शन केले. वाचनालयाच्या अध्यक्ष डॉ.हेमांगी पूर्णपात्रे यांनी पी.डी.दलाल व सुजता अवचट यांचे व सर्व स्पर्धकांचे आभार मानले. प्रमुख पाहुणे प्रा.व्ही.डी.जोशी यांनी विद्यार्थ्यांना रामायण, महाभारत व दासबोधातील अनेक दाखले देत वक्तृत्व कला कशी संपन्न होते याविषयी मार्गदर्शन केले. यात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धुळ्याचा विद्यार्थी कल्पेश हिरे यास प्रथम पारितोषिक रुपये अडीच हजार व चषक प्रदान करण्यात आला. दुसरे पारितोषिक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी राजश्री जयंत कुलकर्णी हिस रुपये १७००, तृतीय पारितोषिक झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर शितोळे यास रुपये १४०० तर कु प्राजक्ता पिंगळे, महेश आहिरे, वरुण घरटे, सृष्टी अहिरे, दीपाली सपकाळ, कल्पेश माळी यांनी उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये ३०० रुपयांची पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, व नाशिक जिल्ह्यातील सुमारे २७ विद्यार्थांनी भाग घेतला.
राजेश ठोंबरे यांनी प्रमुख अतिथी प्रा.व्ही.डी.जोशी, प्रयोजिका सुजाता अवचट यांचा परिचय करून दिला. स्पर्धेनंतर वाचनालयाच्या आवारात संचालक वसंतराव चंद्रात्रे, प्रा.ल.वि.पाठक आदी मान्यवरांंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.