यावल तालुक्यातील किनगाव व नायगाव येथे अतिसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:20 PM2018-09-12T12:20:58+5:302018-09-12T12:22:31+5:30
१० रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार
जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द व किनगाव बुद्रुक येथील अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी पुन्हा पाच नवीन रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यासह एकूण १० रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये नायगाव येथील रुग्णांचाही समावेश असून रुग्ण संख्या ६१वर पोहचली आहे. दरम्यान, गावात २२ पथके तैनात आहेत.
किनगाव येथे अतिसाराची लागण झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांवर किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. गावात ९ रोजी ३२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १० रोजी २२ व ११ रोजी पुन्हा सात रुग्ण जणांना अतिसाराचा त्रास झाला. यातील २८ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये ११ रोजी पंकज शिवाजी साळुंखे (२६), आरिफ खान सलीम (१८),सिकंदर जबरा तडवी (७५) सर्व रा. किनगाव, समशाद गुलशेर तडवी (४५), आरती गौतम कंगरे (४०) रा. नायगाव या पाच जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सोबतच या पूर्वी दाखल झालेल्या नयूम लतिफ तडवी (१६), राबिया शेख सुपडू (१३), चेतन शरद पाटील (३१), हजराबी निसार खाटीक (६५), रा. किनगाव, सलीम सायबू तडवी (४५), रा. नायगाव यांच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णलायात पाहणी
जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची मंगळवारी संध्याकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी विचारपूस करून रुग्णालयात पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
गावात पथक तळ ठोकून
सध्या दोन्ही गावांमध्ये तीन वैद्यकीय अधिकाºयांसह प्रत्येकी तीन जणांचा समावेश असलेले २२ पथके तैनात असून किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅम्प लावण्यात आले आहेत. तेथे रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलिवण्यात येत आहे. याच ठिकाणी चार रुग्णवाहिकादेखील हजर आहे.
साथ नियंत्रणात
गावात पसरलेली साथ नियंत्रणात असल्याची माहिती डॉ. कमलापूरकर यांनी दिली. अद्यापही थोडेफार रुग्ण आढळून येत असले तरी तेथे तैनात पथक तातडीने उपचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी येणार अहवाल
प्राथमिक अंदाजानुसार दुषीत पाण्यामुळे ही साथ पसरली असल्याचा अंदाज असून गावातील नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल बुधवारी येणार असल्याचेडॉ.कमलापूरयांनीसांगितले.
किनगाव येथे दुषीत पाण्यामुळे ही साथ असल्याचा अंदाज असल्याने गावातील पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनींच्या गळतीचे काम हाती घेण्यात आले असून त्यास वेग आला असल्याचे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले.
किनगाव येथील साथ नियंत्रणात असून अद्यापही कोणाला त्रास झाल्यास त्यांनी तत्काळ तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा जिल्हा रुग्णालयात यावे. याबाबत कोणीही घाबरून न जाता दक्षता घ्यावी. तसेच खाजगी डॉक्टरांनीही सहकार्य करावे.
- डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.