मुद्रांक शुल्क सवलतीमुळे दस्त नोंदणी ६५ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:19+5:302021-04-04T04:16:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक सवलत योजनेचा जळगाव जिल्ह्यातील ६४ हजार ४३ नागरिकांनी लाभ घेतला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक सवलत योजनेचा जळगाव जिल्ह्यातील ६४ हजार ४३ नागरिकांनी लाभ घेतला असून यातून फेब्रुवारी महिना अखेर ११० कोटी ९० लाख रुपयांचा मुद्रांक महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या काळातील नोंदणीमध्ये ६५.५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट ओढावल्याने सर्वच क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला. यात बांधकाम क्षेत्रही सुटले नाही. मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच सर्व व्यवहार सुरळीत होत असताना घरांनाही मागणी वाढली. यात बांधकाम क्षेत्राला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कमध्ये सवलत जाहीर केली.
दोन टप्प्यात ही योजना जाहीर झाली. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शासनाने तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलत योजना जाहीर केली होती. तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत दोन टक्क्यांची सवलत होती. या दोन्ही टप्प्यात जळगाव जिल्ह्यात ६४ हजार ४३ दस्तांची नोंदणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर ते डिसेंबर २०२० अखेर ३५,५३१ दस्तांची नोंदणी होऊन ७६.९५ कोटी मुद्रांक महसूल वसूल झाला. त्यानंतर १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ अखेर ३३ कोटी ९५ लाख असा दोन टप्प्यात एकूण ११० कोटी ९० लाख मुद्रांक महसूल वसूल झाला. यामध्ये १ मार्च ते ३१मार्च २०२१ या कालावधीतील मुद्रांक महसुलाची रक्कम वेगळी राहणार आहे, ती अद्याप उपलब्ध झालेली नाही. १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान २८ हजार ५१२ दस्तांची नोंदणी झाली आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी जूननंतर दस्त नोंदणीला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर शासनाने तीन टक्के मुद्रांक सवलतीची योजना जाहीर केली. त्यामुळे सप्टेंबरपासून दस्त नोंदणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला.
दस्त नोंदींची दोन वर्षातील तुलना
महिना---२०१९-२०---२०२०-२१
सप्टेंबर ---४७९२---६९४७
ऑक्टोबर---४३५९---६८४४
नोव्हेंबर---६२९२---८००४
डिसेंबर ---६२९२---१३७३६
जानेवारी ---७४१०---९१४६
फेब्रुवारी---६७२६---९५०५
मार्च---५६४१---९८६१