देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:56 PM2018-10-17T18:56:12+5:302018-10-17T19:06:57+5:30
भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला.
विकास पाटील
जळगाव : भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला.
लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेसाठी ते जळगावात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
भारतीय नागरिक म्हणून ओळख आजही पूसट
ते म्हणाले, देश स्वतंत्र झाला. भारताने संविधान स्वीकारले. मात्र हे संविधान जनतेपर्यंत पोहचू नये यासाठी काही शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मी संगिताच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली तरी जाती-पातीच्या भिंती कायम आहेत. त्या गळून पडणे आवश्यक होते व भारतीय नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे होती. मात्र आपले दुदैव. भारतीय नागरिक म्हणून ओळख आजही पूसट आहे. हे अत्यंत भयावह व हादरुन टाकणारे वास्तव आहे.
धर्मराष्टÑ झाल्यास देशाचे तुकडे होतील
संभाजी भगत म्हणाले, या देशात काही संविधान विरोधी शक्ती कार्यरत असून संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही गोष्टी समोर आणून वातावरण दूषित करण्याचे काम येथे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा पाया मजबूत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. हा पाया उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान काही देशविघातक शक्तींकडून सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यास हे राष्टÑ धर्मराष्टÑ होईल व नंतर ते फुटेल आणि देशाचे मोठे नुकसान होईल.
जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्न
आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत. मात्र हे लोक एकत्र राहू नये देशात दूही निर्माण व्हावी यासाठी काही मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानची जी अवस्था आहे, तशीच आपल्या देशाचीही व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी मी संगिताच्या माध्यमातून एक राष्टÑभक्त म्हणून काम हाती घेतले आहे. जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगिताच्या माध्यमातून लवकर जनतेपर्यंत पोहचता येत आहे. नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संभाजी भगत म्हणाले.