पाल्याचे बँक खाते उघडले काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:39+5:302021-09-26T04:18:39+5:30
स्टार : १२२० सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय पोषण आहाराची मे महिन्यातील रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर देण्याचा ...
स्टार : १२२०
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शालेय पोषण आहाराची मे महिन्यातील रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण ४ लाख ५१ हजार ३८७ लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५७ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी बँक खाती उघडली आहेत. तर अद्याप ९४ हजार ५२ विद्यार्थ्यांनी अजूनही बँक खाती उघडलेली नाहीत.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पोषण आहाराची रोख रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, पाल्याचे बँक खाते काढण्यासाठी पालकांना येणारी समस्या ‘लोकमत’ने आपल्या वृत्तातून मांडली होती. त्यानंतर जिल्हा बँकेने झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास तयारी दर्शविली होती. त्यानुसार आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ३८७ लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५७ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी झीरो बॅलन्सवर खाती उघडली आहेत.
पालकांचा खाते क्रमांक देण्यास मुभा
नवीन परिपत्रकान्वये पालकांचा खाते क्रमांक देण्यास शासनाकडून मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. नवीन निर्णयानुसार ज्या मुलांची आधार नोंद आहे; पण बँक खाते नाही (१० वर्षांखाली) अशा विद्यार्थ्यांचा लाभ त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त नावाने असलेल्या बँक खात्यात जमा होईल. तसेच ज्या मुलांची आधार नोंदणी नाही, त्यांची आधार नोंदणी झाल्यानंतरच त्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त खात्यात रक्कम जमा होणार आहे. शिवाय ज्याठिकाणी बँक उपलब्ध नाही. त्याठिकाणी आधार नोंदणी असलेल्या मुलांच्या / त्यांच्या पालकांच्या / संयुक्त पोस्ट खात्यात रक्कम जमा होणार आहे.
९४ हजार विद्यार्थ्यांनी उघडली नाही खाती
जळगाव जिल्ह्यातील अजूनही ९४ हजार ५२ विद्यार्थ्यांनी बँक खाती उघडलेली नाहीत. दरम्यान, आतापर्यंत ९० टक्के विद्यार्थ्यांनी खाती उघडली असून शंभर टक्के विद्यार्थ्यांनी खाती उघडल्यानंतर संपूर्ण माहिती शासनाला पाठविली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराची रक्कम जमा होणार आहे.
-----
जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्थिती
- खाते न उघडलेले : ९४,०५७
- खाते उघडलेले : ३,५७,३३५
-----