मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातात वाढले मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:03+5:302021-06-30T04:11:03+5:30

लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या वाढलेलीच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोना या महामारीचे मोठे संकट जळगाव जिल्ह्यात कोसळले ...

Died cheap; Epidemic Corona, then increased death in road accidents! | मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातात वाढले मृत्यू !

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातात वाढले मृत्यू !

Next

लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या वाढलेलीच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोना या महामारीचे मोठे संकट जळगाव जिल्ह्यात कोसळले आहे. कोरोनाच्या या महामारीत जळगाव जिल्ह्यात २,५७० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच रस्ते अपघातात देखील याच काळात दीड वर्षात १,०५२ अपघात झाले, त्यात ६७९ जणांचा मृत्यू झाला. १,४७३ जण जखमी झाले आहेत. २०१८ ते मे २०२१ या साडे तीन वर्षात २ हजार ७३९ अपघात झाले आहेत. त्यात १ हजार ५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ९५७ जण जखमी झालेले आहेत.

अपघात व त्यात जीव जाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त जळगाव जिल्ह्याचीच आहे. भरधाव वेगाने वाहने चालविणे, मद्य प्राशन यासोबतच खराब रस्ते या अपघातांना कारणीभूत आहे. जिल्ह्यात लोकसंख्या जशी वाढत आहे, तशीच वाहनांचीही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. घर तेथे वाहन अशी स्थिती जिल्ह्यात आहे. मद्य प्राशन व सुसाट वेगाने वाहने चालविल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यात सर्वाधिक तरुणांचाच बळी जात आहे.

शहर व जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्यमार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. या खड्ड्यांमुळेही अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. महामार्गावर तर खड्ढे व साईडपट्ट्या यामुळे अपघात होत आहेत. वाहतूक पोलीस व आरटीओ यांनी कितीही जनजागृती केली तरी वाहनचालकांची मानसिकता बदलत नाही. दंड भरायलाही वाहनधारक तयार होतात, परंतु वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. अवैध प्रवाशी वाहतूक करताना प्रवाशी मिळविण्याची स्पर्धाच घातक ठरत असून महागड्या दुचाकी यामुळे वेगाची मर्यादा ओलांडली जात आहे.

लॉकडाऊनमध्येही वाढले अपघात..

लॉकडाऊन काळात अनेक निर्बंध असल्याने अनावश्यक बाहेर फिरणारे असतील किंवा सरकारी बसेसला परवानगी नव्हती. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी असला तरी या काळात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव गेला आहे. यंदाच्या मार्च ते मे या तीन महिन्यात ११७ अपघातात १०७ जण ठार झाले तर ५३ जण जखमी झाले. गेल्या वर्षी लॉकडाऊन काळातच सर्वाधिक अपघात झाले असून एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १८८ अपघात झाले आहे. त्यात १४४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७४ जण जखमी झालेले आहेत.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

पायी चालणाऱ्या किंवा मॉर्निंग वॉक करणाऱ्या अनेकांना भरधाव वाहनाने उडविल्याच्या घटना जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. कोरोना काळातच पायी चालणाऱ्या एका वकिलाला डंपरने उडविले होते. सामनेर,ता.पाचोरा येथेही पायी चालणाऱ्या दोन महिलांना पहाटेच्या सुमारास चारचाकीने उडविल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

या अपघातात ४० वर्षाच्या आतील मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. देशात दहशतवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीन पेक्षा जास्त अपघात झाले असतील तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

महामार्गाला लागून अनेक ठिकाणी धोकादायक चौक आहेत. अग्रवाल हॉस्पिटल, शिव कॉलनी, गुजराल पेट्रोल पंप, विद्युत कॉलनी, खोटे नगर, अजिंठा चौक हे चौक अत्यंत धोकादायक आहेत. शिव कॉलनी व बांभोरी पुलाजवळील कठडेही धोकादायक आहेत. तसेच महामार्गाला लागून अनेक ठिकाणी साईडपट्ट्या अतिशय उंच आहेत. गतिरोधकही नियमात नाहीत. बांभोरी ते डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या दरम्यान अपघाताची संख्या व त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. शिव कॉलनी व तरसोद फाटा हे शहरात दोन ब्लॅक स्पॉट जाहीर करण्यात आले आहे.

वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य !

फोटो...

पहूरजवळ ट्रॅव्हल्स बसने आमच्या चारचाकीला कट मारल्याने आमचे वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात पाय फ्रॅक्चर झाला. दोन वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. या अपघातातून नशिबाने बचावलो आहे.

-भैया पाटील, अपघातातून बचावलेला तरुण

फोटो....

दोन वेळा अपघातातून बचावलो आहे. ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत वाहन पलटी होऊन सहकारी गंभीर जखमी झाला होता. स्वत: वाहन चालवत असल्याने बचावलो होतो. विरुध्द दिशेने बसने धडक दिली होती. वाहनाचा चक्काचूर झाला होता. वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले होते.

-प्रदीप पाटील, अपघातातून बचावलेला वाहन चालक

असे आहेत साडे तीन वर्षातील अपघात

वर्ष : अपघात मृत्यू जखमी

२०१८ ८५२ ४२२ १२६०

२०१९ ८३५ ४५४ १२२४

२०२० ७२१ ४७१ १०३९

२०२१ ३३१ २०८ ४३४

(मे पर्यंत

पहिला लॉकडाऊन १८८ १४४ ७४

दुसरा लॉकडाऊन ११७ १०८ ५३

--

Web Title: Died cheap; Epidemic Corona, then increased death in road accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.