अकार उकार मकार भेद मावळला।।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:33+5:302021-06-01T04:13:33+5:30
१) ब्रह्मचित्कला : मुक्ताई ही परब्रह्माची प्रत्यक्ष शक्ती आहे. स्त्री शक्तीच्या माध्यमातून चित शक्ती व ब्रह्मकला (आविष्कार) असणारी परब्रह्म ...
१) ब्रह्मचित्कला : मुक्ताई ही परब्रह्माची प्रत्यक्ष शक्ती आहे. स्त्री शक्तीच्या माध्यमातून चित शक्ती व ब्रह्मकला (आविष्कार) असणारी परब्रह्म परमात्म्याची माया चित शक्ती! याचमुळे तिला आदत्रय जननी असेसुध्दा म्हटले जाते.
२) योगमाया : मुख्यतः मायेचे दोन प्रकार पडतात. एक विद्यामाया आणि दुसरी अविद्यामाया. अविद्यामाया ही जीवाला बंधनात टाकणारी आहे तर विद्यामाया ही ब्रह्माची शोभा आहे. विद्यामायेचे स्वरूप कनक व कांतीच्या माध्यमातून लक्षात येते.
ज्या प्रमाणे सोो व सोन्याची चकाकी वेगळी नसून एकच आहे, त्याचप्रमाणे ही योगमाया व परब्रह्म हे तत्त्वरूपाने एकच आहेत.
३) आदिशक्ती : ज्या शक्तीला आदी नाही, अशी ही अनादी असणारी ब्रह्मा-विष्णू-महेश यांना ऊर्जा देणारी व सगुण स्वरूपाकार करणारी जी शक्ती आहे तिला आदिशक्ती असे म्हटले जाते.
एकनाथ महाराजांनी मुक्ताबाईचे वर्णन करताना असे म्हटले आहे की ,
महाकल्पवरी चिरंजीवी शरीर ।
कीर्ती चराचर त्रिभुवनी ।।
आणि दुसऱ्या अभंगांमध्ये नाथ महाराज म्हणतात,
नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य ।
अकार उकार मकार भेद मावळला ।।
जिथे प्रणवाचा (ओंकाराचा) लय पावतो अशी अभेद अवस्था प्राप्त होते या स्थितीला मुक्ताई प्राप्त होत्या. अशी ही आपली आदिशक्ती तिचा हा तिरोभूत अंतर्धान सोहळा. तिरोभूत या शब्दाचा अर्थ असा की स्व-स्वरूपात विलीन होणे. मुक्ताई या जीवनमुक्त होत्या, तरीही अंतर्धान पावण्याच्या काही काळापूर्वी निवृत्तिनाथांनी मुक्ताईला प्रश्न केला.
निवृत्तीने विचारले मुक्ताईशीं ।
गमन कोणे दिवशी आरंभिले ।।
त्यावर मुक्ताई म्हणाल्या ,
मुक्ताई म्हणे जावे यावे कोठे ।
अवघे निघोट स्वरूप स्वामी ।।
जर आलोच नाही तर जाण्याचा प्रश्नच नाही. सर्वत्र निघोट (अमर्यादित व व्यापक) स्वस्वरूप ब्रह्म व्याप्त असल्याने मुक्ताई पुन्हा म्हणतात,
मावळला दीप ज्योत कोठे होती ।
सहजा सामावती निरंजनी ।।
या मुक्ताई वचनाप्रमाणे आदिशक्ती मुक्ताईंनी आपले दृष्टी गोचर असणारे शरीर अनंतात विलीन केले. परंतु आजही तत्त्वरूपाने मुक्ताबाई आपल्या सर्वांमध्ये सामावली आहे.
- उदय विलास सोनोने, मुक्ताईनगर.