क्वारंटाईन केंद्रातील प्रकार : हजेरी पत्रक व प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांमध्ये तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:51 PM2020-08-02T12:51:22+5:302020-08-02T12:51:46+5:30
सभापती, नगरसेवकांकडून पाहणी
जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रकिनेतनमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटर तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये हजेरी पत्रकावर जादा कर्मचारी दाखविले जातात, प्रत्यक्षात मात्र कमी कर्मचारी उपस्थित असल्याचा प्रकार शनिवारी मनपा स्थायी समिती सभापती अॅड़ शुचिता हाडा व काही नगरसेवकांनी केलेल्या पाहणीत समोर आला आहे़ ठेकेदाराकडून हे अधिकचे कर्मचारी दाखवून महापालिकेकडून केवळ बिले काढली जात आहे़ याबाबत आपण प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सभापतींनी म्हटले आहे़
कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाची गुणवत्ता व स्वच्छतेच्या बाबती नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे व अन्य काही नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी आल्या होत्या़ शिवाय ठेकेदार जेवढे स्वच्छता कर्मचारी रेकॉर्डवर दाखवतात प्रत्यक्षात तेवढे कर्मचारी काम करीत नाहीत, असाही प्रकार सुरू असल्याबाबत शहानिशा करण्यासाठी सभापती अॅड़ हाडा व काही नगरसेवकांनी शनिवारी सकाळी क्वारंटाईन व कोविड केअर सेंटरची पाहणी केली़ यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, कुलभूषण पाटील, नगरसेविका मंगला चौधरी, दीपमाला काळे, मनिषा पाटील, भरत काळे, पिंटू काळे, विठोबा चौधरी आदी उपस्थित होते़ महासभेत प्रशासनाला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार आहेत़