जगाच्या अनेकांनी मांडलेल्या वेगवेगळ्या संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:33 PM2018-06-04T23:33:56+5:302018-06-04T23:33:56+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘जगण्याचे अंतरंग’ या सदरात प्रा.विनायक त्र्यंबक पाटील यांचा लेख ‘जग.’

 Different concepts set by many of the world | जगाच्या अनेकांनी मांडलेल्या वेगवेगळ्या संकल्पना

जगाच्या अनेकांनी मांडलेल्या वेगवेगळ्या संकल्पना

Next

आतापर्यंत विविध संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत. त्यातील काही ठळक संकल्पना अशा आहेत.
१) जग किंवा हा प्रपंच मनोनिर्मित आहे. तो मनाच्या उचंबळातून तयार झालेला आहे. हा प्रपंच कैक शतकांच्या संस्कारातून आपल्यापर्यंत आला आहे.
२) जग व जगातील सर्व सजीव, अजीव या वस्तू अंतिमत: अवकाशयुक्त अणुतून निर्माण झालेल्या आहेत.
३) हे जग सतत प्रसरण पावत आहे म्हणजे त्यात गती आहे. गती हे उर्जेचे रूप आहे. जग म्हणजे उर्जेची अनंत रुपे होत.
४) जगाचा कोणीही निर्माता नाही. अवकाश, उर्जा, भौतिकवस्तू यांच्या सुयोग्य संयुगातून भौतिकशास्त्राच्या सिद्धांतानुसार निर्माण झालेले आहे. पुढेही राहील.
आपल्या पूर्वजांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या विचारसरणीप्रमाणे मनुष्य हाही या प्रपंचाचा एक अंश आहे. या जगाचा विधाता आहे, तोच जग नियंता आहे. त्याचप्रमाणे मानव जन्म हीसुद्धा त्याच जग-नियत्याची लीला आहे. जे ब्रह्मांडी तेच पिंडी हे लक्षात घेऊन या प्रश्नांची उकल करायची मांडणी त्यांनी केली होती म्हणून त्यांनी आपल्या पिंडात असणाऱ्या आत्म्याचा शोध घेतलेला आहे. आत्मा शोधला म्हणजे परमात्मा शोधता येईल हाच त्यांचा मार्ग होता. या विचाराच्या मूळाशी होते तर्क आणि अनुमान हा वारसा देणाºया पूर्वजांचे स्मरण करा व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा.
आपल्याप्रमाणेच पाश्चात्य देशातसुद्धा या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्न केलेला आहे. त्यांनी या प्रपंचाच्या मध्यभागी मानव ठेवून विज्ञानाच्या मार्गाने हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनीही निसर्ग व सृष्टीतील अनेक रहस्यांची उकल केली आहे. प्रत्यक्ष आणि प्रमाण यांचा उपयोग केला. आपल्या पूर्वजात या मार्गांचाही पाठपुरावा केलेला आहे. प्रकृती व पुरुष हेच दोन घटक धरून चार्वाक परंपरा अजून जिवंत आहे. त्याला आता आपण ‘लोकायत’ या नावाने जाणतो. दोन्ही परंपरांनी तत्वज्ञानाचा भक्कम पाया घातलेला आहे. तत्वज्ञानात प्रत्यक्ष, प्रमाण, तर्क आणि अनुमान हे चार महत्त्वाचे स्तंभ आहेत.
विधात्याने जग निर्माण केले आहे आणि तोच जगाचा नियंताही आहे, हा आपला विश्वास आहे. तेव्हा प्रथम विधात्याचा शोध घ्यायला हवा. मग त्याच्या हेतूचा शोध घेता येईल. जर विधाताच मान्य नसेल तर मग अंधारात उजेड कसा शोधता येईल. त्यासाठी काही पूर्वजांनी आत्मशोधाचा मार्ग धरला आहे. ते म्हणतात आत्म्याचा शोध लागला की परमातमाही शोधता येईल. अजूनही हा शोध सुरू आहे. हे विश्व किंवा ब्रह्मांड प्रत्यक्षात कोणत्या स्वरूपात आहे, ते बघू. पदार्थ-सजीव व अजीव, उर्जा, अवकाश आणि काळ यांच्या मिश्र स्वरूपात हे ब्रह्मांड आहे. अशी अनेक ब्रह्मांडे आहेत यावर पूर्वीपासून विश्वास आहे.
पदार्थ विज्ञानानुसार ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू-सजीव, अजीव, स्थिर-अस्थिर, द्रव अद्रव ही सर्व उर्जेची विविध आणि भिन्न आकार व स्वरूपे आहेत. आपल्या मृत्यूनंतर काय? आपले भौतिक शरीर पंचत्वात विलीन होते. ती पंचतत्वे आहेत. जल, वायू, तेज, भूमी आणि आकाश. आपण अणूपासून अणुशक्ती आणि अणुबॉम्ब दोन्ही साध्य केलेली आहेत. अजूनही कृष्ण विवर आणि त्यातील क्रिया निश्चित माहीत नाहीत. आपण फक्त अनुमानच बांधू शकतो. त्याप्रमाणेच आत्म्याचा गूढ प्रवास माहीत नाही; आणि आत्माही गवसलेला नाही.
आपले मन प्रचंड सामर्थ्यशाली आहे. आपले मनच आपणाला उच्चपदी नेऊ शकते आणि आपल्या अधोगतीलाही आपले मनच कारण असते. शांत मन आपला सर्वोत्तम मित्र असते आणि अशांत मन आपला विनाश करणारा शत्रूही बनते. याचा अर्थ आपल्या जगण्यासाठी आपला मनाचा महत्त्वाचा भाग असतो. एवढेच लक्षात असू द्या.
ब्रह्मांडातील सर्वच वस्तू जर उर्जेचेच स्वरूप असेल तर मनुष्यसुद्धा उर्जेचेच रुप आहे, असे म्हणावे लागेल. सजीव आणि निर्जीव यांच्यात फरक असतो तो फक्त प्राणशक्तीचा. प्राण शक्तीचा प्रवेश कसा झाला हा आपला प्रांत नाही. ते विज्ञानावर सोडून देऊ. मानवाचा सतत संघर्ष चालू असतो तो म्हणजे आपले अस्तित्व टिकविण्याचाच प्रयत्न असतो.
हे जग म्हणजे हा भौतिक प्रपंच. हे जग आपल्या जन्माच्याही अगोदर होते आणि मृत्यूनंतरही राहणारच आहे. मनुष्य विचार करू लागल्यापासून हे जग कुणी निर्माण केले हे निर्माण करण्याचा हेतू काय? हा प्रश्न पूर्वी होता. आताही आहे आणि पुढेही राहणारच आहे.
- प्रा.विनायक त्र्यंबक पाटील

Web Title:  Different concepts set by many of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.