रस्ता खोदल्यामुळे विजेचे खांब कोसळून अपघात घडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:50+5:302021-06-01T04:13:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी विद्युत खांब हटविण्यापूर्वीच रस्ता खोदण्यात आल्यामुळे, या ठिकाणी असलेली अतिउच्च क्षमतेची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी विद्युत खांब हटविण्यापूर्वीच रस्ता खोदण्यात आल्यामुळे, या ठिकाणी असलेली अतिउच्च क्षमतेची विद्युत लाइन जोरदार वाऱ्याने कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तत्काळ खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणारे विद्युत खांब अखेर महावितरण प्रशासनातर्फेच हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासनातर्फे या कामाची जोरदार तयारी करण्यात येत असून, यासाठी सोमवारी दुपारी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र डांगे, सहायक अभियंता रोहित गोवे, विजय कापुरे यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाची पाहणी केली. या वेळी त्यांना टॉवर चौकापासून ते जुन्या जिल्हा परिषद इमारतीपर्यंत अनेक ठिकाणी वीज खांबांच्या आजूबाजूला दोन ते अडीच फुटांपर्यंत खोदकाम केलेले आढळून आले. विशेष म्हणजे वीज खांब हटविण्याआधीच खोदकाम करण्यात आल्यामुळे आजूबाजूचा परिसर पूर्णपणे मोकळा झाला आहे. तसेच पुढील आठवड्यापासून पावसाळा सुरू होणार असल्याने, पावसाच्या पाण्यामुळे येथील मातीचा भाग पूर्णपणे खचून हे विद्युत खांब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर दिवसा हे खांब कोसळले तर जीवितहानी होण्याची शक्यताही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
इन्फो :
मनपा आयुक्तांना दिले पत्र
या प्रकाराबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना संभाव्य धोका आणि अपघाताची परिस्थिती लक्षात घेता तत्काळ खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच खांब हटविण्याआधीच खोदकाम केल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.