‘खाकी’वरील विश्वास डागाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 04:19 PM2018-09-06T16:19:51+5:302018-09-06T16:23:39+5:30
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य. जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत, कर्तव्याशी प्रामाणिक आहोत असा बोध या ब्रीद वाक्यातून होतो. मात्र गेल्या महिन्याभरापासून जळगाव शहर व जिल्ह्यात ज्या घटना घडताहेत त्यातून ‘खाकी’ पुरती बदनाम झालेली आहे.
सुनील पाटील
जळगाव : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य. जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत, कर्तव्याशी प्रामाणिक आहोत असा बोध या ब्रीद वाक्यातून होतो. मात्र गेल्या महिन्याभरापासून जळगाव शहर व जिल्ह्यात ज्या घटना घडताहेत त्यातून ‘खाकी’ पुरती बदनाम झालेली आहे. कधी नव्हे इतक्या घरफोडी व चोरीच्या घटना आॅगस्ट महिन्यात घडल्या. दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यापैकी एकही घटना उघडकीस आलेली नाही. श्रावणमासात चोरी व घरफोडीच्या घटनांचे प्रमाण अगदी नगण्यच म्हणजे नसल्यासारखेच असते. यंदा मात्र हा समज खोटा ठरला. त्यानंतर योगेश वाघ या रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या कर्मचा-याचे प्रकरण पुढे आले. ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी त्याच पोलिसाने ‘खाक’ गणवेशातच महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केले. अर्थात अपेक्षेप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यानंतर पुढे जावून त्याला निलंबितही करण्यात आले. शासकीय सोपस्कार पार पाडण्यात आलेला असला तरी खाकीवरील बदनामी डाग पुसला जावू शकत नाही. हे प्रकरण चर्चेत असताना पुन्हा त्याच पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या सागर तडवी या पोलिसाचे दुसरे प्रकरण पुढे आले. एका सहकारी पोलिसाच्या पत्नीशीच त्याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप झाला. इतकेच काय त्याला कंटाळून एका पोलिसाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या पोलिसाने सागरचे कारनामे एका चिठ्ठीत लिहिले होते. या पोलिसाने आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलीस अधीक्षकांनीच पुढाकार घेवून तडवी याच्यावर कारवाई केली. सातत्याने होणाºया घरफोड्या, महिलांची छेडखानी व अनैतिक संबंध यामुळे खाकीवर लागलेला डाग पुसला जावू शकत नाही. या घटनांमुळे सामान्य जनतेचाही विश्वास उडाला आहे.