सुक्यामेव्याचे भाव कमी झाल्याने डिंकाच्या लाडूंना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:55+5:302020-12-27T04:11:55+5:30
जळगाव : निम्म्याहून अधिक डिसेंबर महिना संपला तरी गायब असलेली थंंडी गेल्या आठवड्यापासून चांगलीच वाढीस लागल्याने सुक्यामेव्याला ...
जळगाव : निम्म्याहून अधिक डिसेंबर महिना संपला तरी गायब असलेली थंंडी गेल्या आठवड्यापासून चांगलीच वाढीस लागल्याने सुक्यामेव्याला चांगलीच मागणी वाढली असून डिंक, मेथीच्या लाडूसाठी बाजारात खरेदीसाठी रेलचेल आहे. त्यात यंदा सुकामेव्याचे भाव कमी झाल्याने त्यांना मागणीदेखील चांगली वाढली आहे. विशेष म्हणजे, विविध कंपन्या रेडिमेड लाडू तयार करीत असल्या तरी घरगुती लाडूलाच पसंती कायम आहे.
थंडीची चाहूल लागताच गृहिणींची लगबग सुरू होते ती डिंकाचे लाडू करण्यासाठी. हिवाळ्यात उत्तम प्रकृतीसाठी हिरव्या पालेभाज्यांसह आरोग्यवर्धक इतरही पोषक पदार्थ खाण्याकडे कल असतो. त्यामुळे एरव्ही उन्हाळ्याच वर्ज्य असलेल्या गरम पडणाऱ्या व शरीरास ऊब देणाऱ्या वस्तू हिवाळ्यात आवर्जून सेवन केल्या जातात.
सध्या बाजारात डिंक, मेथी व सुकामेव्याचा लाडूच्या साहित्याचा बाजार गरम आहे. सध्याचे धकाधकीचे जीवन पाहता लोणचे व इतर पदार्थांसह तयार (रेडिमेड) लाडूही कंपन्या बनवित आहे. मात्र घरगुती लाडूंसाठी घटक पदार्थांची खरेदी केली जात आहे.
भाव कमी झाल्याचा लाभ
यंदा कोरोनामुळे युरोपीय देशात अजूनही विविध वस्तूंची खरेदी वाढलेली नाही. त्यात सुक्यामेव्याचाही समावेश आहे. कोकणातील काजू, अफगाणिस्तानातील बदाम, पाकिस्तानातील खारीक यांची युरोपीय देशात फारशी निर्यात होत नसल्याने त्यांचे भाव कमी झाले आहे. यात गेल्या वर्षी ८०० रुपये किलो असलेल्या बदामचे भाव यंदा ६०० रुपयांवर आले आहे. तसेच गेल्या वर्षी ९०० रुपये किलो असलेले काजू यंदा ८४० रुपये, पिस्ता १ हजार ८५० रुपयांवरून १ हजार ५५० रुपयांवर आले आहे. यामुळे डिंक, मेथीच्या लाडूंसाठी सुक्यामेव्याचा अधिक वापर वाढला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले
थंडी वाढू लागली तेव्हापासून डिंक, मेथीच्या लाडूसाठी घटक पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यात यंदा सुकामेव्याचे भाव कमी झाल्याने त्याला अधिक मागणी वाढली आहे.
- सुरेश बरडिया, सुकामेवा विक्रेता.