संचालक आमदाराचे दूध संघासमोरच धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:55 PM2020-08-02T12:55:32+5:302020-08-02T12:56:46+5:30
जळगाव, नशिराबादेत रास्ता रोको
जळगाव : दुध उत्पादकांच्या दुधाला हमीभाव द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी भाजपतर्फे गरिबांना दूध वाटप करून शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे आपण संचालक असलेल्या दूध संघासमोरच आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलन केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दूध उत्पादकांच्या दुधाला भाव नाही, कोरोना काळात दुधाला उठाव नाही, हॉटेल्स रेस्टॉरंट, खानावळी, मिठाईची दुकाने व थंडपेय, आईस्क्रिम, लस्सी, चहा कॉफीची दुकाने सर्व काही गेल्या ४ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. दुधाला दहा रुपये भाववाढ मिळावी व दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान मिळावे, या मागण्यांसाठी भाजपतर्फे शनिवारी आंदोलन करण्यात आले.
जळगावात दुध फेडरेशनसमोर व संपूर्ण परिसरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली व व गरीब गरजूंना दूध वाटप करून धरणे आंदोलन केले.
याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी, अॅड. शुचिता हाडा, भगत बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, राजेंद्र मराठे, प्रा. भगतसिंग निकम, प्रवीण जाधव, उज्ज्वला बेंडाळे, ललित चिरमाडे, सुभाष सोनवणे, जितेंद्र मराठे, कैलास सोनवणे, नाना कोळी, रमेश आहुजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नशिराबादलाही आंदोलन
नशिराबाद येथेही दूध दराविरोधात आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, चंदूलाल पटेल, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. नशिराबाद महामार्गावर दुधाची गाडी अडवून त्यातील दूध संकलित करण्यात आले. या अडीचशे लिटर दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, माजी सभापती प्रभाकर सोनवणे, कमलाकर रोटे, अरुण सपकाळे, संतोष नारखेडे, योगेश पाटील, माजी सरपंच प्रदीप बोढरे, मनोहर पाटील, हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, सचिन पवार, जितेंद्र महाजन, राजू पाचपांडे, ललित बराटे, मोहन येवले, पप्पू रोटे, सुदाम धोबी, सुनील लाड, भाऊसाहेब पाटील, सचिन महाजन, डॉ. नजरूल इस्लाम, दर्शन जोशी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.