शासकीय अनास्थेपुढे धरणगावच्या अपंग शिक्षकांची झुंज ठरली अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:53 PM2017-11-21T17:53:57+5:302017-11-21T18:04:21+5:30
पक्षघाताने जरजर झालेल्या तरुण शिक्षकाचा पगार बिलासाठी फिरफिर सुरु असताना झाला मृत्यू
शरदकुमार बन्सी / आॅनलाईन लोकमत
धरणगाव,दि.२१ : पत्नीच्या निधनाचे दु:ख, त्यातच तरुणपणात पक्षाघातामुळे आलेले अपंगत्वाने त्रस्त असलेल्या धरणगाव येथील नितीन पाटील या शिक्षकाची थकीत पगार बिलासाठीची झुंज अपयशी ठरली. शासकीय अनास्थेमुळे जिवंतपणी या शिक्षकाची बिले मंजुर तर झाली नाहीत. त्यामुळे मृत्यूनंतर तरी शासनाकडून न्याय मिळणार का? असा सवाल पित्याने उपस्थित केला आहे.
धरणगावातील सत्यनारायण चौकात राहणारे मगन पाटील यांचा मुलगा नितीन पाटील हे एरंडोल येथील जिजामाता हायस्कूलच्या बालशिवाजी विद्या मंदिरात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. आॅक्टोबर २०११ मध्ये त्यांची धर्मपत्नी सविता यांचे भाऊबिजेच्या दिवशी हृदयविकाराने निधन झाले होते. दोन मुलींना सोडून पत्नी गेल्याचे दु:ख त्यांच्या हृदयात घर करून होते.
तीन वर्षांपूर्वी पक्षघाताच्या झटक्याने आले अपंगत्व
नितीन पाटील यांना २०१४ मध्ये पक्षघाताचा झटका आला व त्यांचा एक हात व एक पाय निकामी होऊन अपंगत्त्व आले. काही दिवस त्यांनी शाळेत काम केले. १६ वर्षे नियमित सेवा झाली, मात्र अपंगत्त्वाने त्यांना काम करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मेडिकल बोर्डाकडून अनफिट प्रमाणपत्र देऊन सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. सध्या हे प्रकरण ईजी आॅफीस, मुंबई येथे प्रलंबित आहे. मागील कालावधीत बजावलेल्या दीड वर्षाची पगार बिले दीड-दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या पे-युनीट कार्यालयात पडून आहे. सुमारे पाच लाखांचे पगार बिले निघाली तर घर संसार, मुलींचे शिक्षण, उपचारासाठी कामात येतील, अशी आशा त्यांना होती.
हक्काच्या रकमेसाठी वृद्ध पित्याने झिजविल्या चपला
गेल्या तीन वर्षाच्या आजारपणात त्यांना लाखोंचा खर्च आला. त्यामुळे घरात आर्थिक अडचण भासायची, या चिंतेत ते होते. थकीत पगार बील निघावे यासाठी त्यांचे वडील मगन पाटील यांनी पे-युनीटला जाऊन चपला झिजवल्या, मात्र त्यांचे बील निघालेच नाही. आर्थिक विवंचनेत चिंताग्रस्त झालेल्या शिक्षक नितीन पाटील यांचे १४ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. शासकीय अनास्थेपुढे आर्थिक परिस्थिती आणि अपंगत्वाने आधीच हैराण असलेल्या शिक्षकाला हार मानावी लागली.
आजारपणामुळे परिवार आर्थिक संकटात
मयत शिक्षक नितीन पाटील यांच्या पश्चात ७५ वर्षीय पिता मगन पाटील, ७० वर्षीय वयोवृद्ध आई, मोठी मुलगी श्रद्धा (प्रथम वर्ष), मानसी (इ.९ वी), दोन बहिणी असा परिवार आहे. मुलाच्या आजारपणात झालेल्या खर्चाने पाटील परिवार आर्थिक संकटात सापडलेला आहे.
मृत्यूनंतर तरी पगार बील मंजूर होणार का?
शिक्षकाच्या मृत्यूनंतर तरी पेयुनीटला वर्षा दीड वर्षापासून धूळ खात पडलेले पगार बील मंजूर होईल का? असा प्रश्न मयत शिक्षकाचे वयोवृद्ध वडील मगन पाटील यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या अधिकाºयांनी निदान गरजू कर्मचाºयांची बिले कुठलीही अपेक्षा न करता मंजूर केली तर त्यांना ‘त्या’ परिवाराचा आशीर्वाद लाभेल. एकुलत्या एक मुलाचे तरुणपणी उद्ध्वस्त झालेले आयुष्य वयोवृद्ध आई-वडिलांना चटका लावून गेला आहे.