कोरोनायोद्धा नामांकनात दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 05:59 PM2021-01-15T17:59:44+5:302021-01-15T17:59:52+5:30
आरोग्य सेवकांचा समावेशच नाही, अन्याय झाल्याने संताप व्यक्त
हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ यांचा समावेश केला आहे, मात्र यातून आरोग्य सेवक, कक्ष सेवक, सहायक सेवक यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवक व कक्ष सेवक यांनी संताप व्यक्त करीत आम्ही कोरोनायोद्धे नाही काय, असा सवालही उपस्थित केला आहे.
काम करूनही उपेक्षितच
गेल्या २२ मार्चपासून आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोनाविरोधात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा देत आहेत. यात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, तर काहीचा जीवही गेला. अशा परिस्थितीत कार्य करताना तसेच सर्वांचा सक्रिय सहभाग असताना असा दुजाभाव का? उत्कृष्ट कोरोना वाॅरियर्स नामांकन यादीतून आरोग्य सेवक आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, औषधनिर्माण अधिकारी, स्वच्छतादूत यांना का? वगळण्यात आले, असा प्रश्न उपस्थितीत करत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
याबाबत मुक्ताईनगर तालुका आरोग्य अधिकारी निलेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर आरोग्य सेवक व्ही. एम. पाटील, व्ही. एस. चौधरी, व्ही. एस. पाटील , आर. आर. ठोंबरे, एम. के. तारू, एस. एन. येशी, एस. डी. विसपुते, जे. आर. मिसर, ए. बी. हिरोळे, ए. आर. जाधव, ए. आर. गंगातीरे, आर .आर. सुरवाडे, आर .व्ही. कोळी, ए. टी.बारी, एम.डी. चौधरी, आर.आर. वाघ, व्ही. आय. मोरे, एस. जी. पाटील, पी. आर. पवार, पी. एस. मोरे, ए. व्ही. गटमणे, ए. सी. ठाकरे आदी आरोग्य सेवक व आरोग्य सहायक यांच्या सह्या आहेत. या सर्वांनी निवेदन सादर केले.
तीन महिन्यांपासून पगार नसल्याने हाल
तीन महिन्यांपासून पगार नसल्याने आरोग्य सेवकांची यंदाची संक्रांत ही कडूच गेली. २४ तास सेवा देत आरोग्य कर्मचारी आपल्या मुलाबाळांची तमा न बाळगता कोरोना रुग्णांना सेवा देत आहे. मात्र तीन महिन्यांपासून पगार नसल्याने यंदाची संक्रांत ही कडूच झाली असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. हक्काची व मेहनतीची कमाई त्वरित देण्यात यावी, अशी अपेक्षा या सेवकांनी केली आहे. काम करून जर कष्टाचे दाम भेटत नसेल तर काय फायदा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे .