बेपत्ता वृध्देचे मृत्यू प्रकरण : सत्य शोधण्यासाठी एसआयटी स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:39 AM2020-06-13T11:39:55+5:302020-06-13T11:40:50+5:30
डॉक्टरांवर कारवाईचा बडगा; पोलिसांची जबाबदारी नाही का?
जळगाव : बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित मालती नेहते या वृध्देच्या मृत्यूस जबाबदार व कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवून अधिष्ठाता व दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली, मग महिला बेपत्ता झाल्याचे कळवूनही त्याची चौकशी न करणाऱ्या पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का? असा सवाल निलंबित झालेल्या डॉक्टरांसह कोरोना रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, मालती नेहते यांच्या मृत्यूस नेमके कोण जबाबदार आहे, हे सत्य शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी आठ जणांची एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे.
मालती नेहते यांच्या मृत्यूप्रकरणी वॉर्ड क्र.७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर दुसºयाच दिवशी अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे, सहायक प्राध्यापक डॉ.सुयोग चौधरी व कनिष्ठ निवासी डॉ.कल्पना धनकवार यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईनंतर २४ तास कोरोना रुग्णालयात काम करणाºया डॉक्टर व कर्मचाºयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. काम करणाºयांना निंलबित केले, मग काम न करता लाखोने पगार घेणारे डॉक्टर तसेच बेपत्ताची माहिती कळवूनही तपास न करणाºया पोलिसांचे काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. नेहते या दोन जून रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना कळविली. ज्या पोलीस कर्मचाºयाला माहिती कळविली, त्याची नोंद रुग्णालयाच्या दप्तरी घेण्यात आली. तेव्हापासून तपास करण्याची जबाबदारी पोलिसांची होती असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
एसपी म्हणतात, लेखी तक्रार दिल्यापासून कारवाई सुरु
यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना विचारले असता, पोलिसात लेखी कळविल्यानंतर त्याच दिवशी हरविल्याची नोंद घेण्यात आली व तेव्हापासूनच तपास सुरु करण्यात आला. यात कुठलीही कुचराई केलेली नाही. नेहते या दोन जून रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्याच दिवशी रुग्णालय प्रशासनाने लेखी कळवायला हवे होते, मात्र त्यांनी तसे कळविले नाही. तोंडी कळविण्याला अर्थ नाही. एखादी घटना घडली तरी त्याचा लेखी मेमो रुग्णालयाकडून पोलीस ठाण्यात पाठविला जातो, मग या घटनेत का नाही कळविला? असेही डॉ.उगले म्हणाले. दरम्यान, या घटनेत २ ते ५ तीन दिवस फक्त टोलवाटोलवी व जबाबदारी झटकण्याचेच काम झाल्याचे यावरुन सिध्द होते. हे प्रकरण ना रुग्णालयाने गांभिर्याने घेतले, ना पोलिसांनी. रितसर हरविल्याची नोंद झाल्यानंतरच सूत्रे हलली व त्यानंतरही पाच दिवसांनी नेहते यांचा मृतदेह आढळून आला.
पहिल्याच दिवशी २० जणांचा जबाब
एसआयटीने शुक्रवारी पहिल्याच दिवशी कोविड रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय व सफाई कामगार अशा २० जणांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी रुग्णालयात जावून चौकशी केली व कोणाचे जबाब नोंदवायचे याची यादी तयार केली, साधारण ५० जणांचे जबाब यात घेतले जाणार आहे. दुसºया एका पथकाने भुसावळ येथे नेहते यांच्या घरी, गल्लीत तसेच रेल्वे रुग्णालयात जावून चौकशी केली. तेथेही काही जणांचे जबाब नोंदविण्यात आले.
महिला बेपत्ता झाल्यानंतर रुग्णालयाने रितसर लेखी कळविणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी कळविले नाही. जेव्हा लेखी तक्रार आली, तेव्हापासून तपासाला गती देण्यात आली. मृत्यूस नेमके कोण जबाबदार आहे, कोणाचा हलगर्जीपणा झाला आहे याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी ८ जणांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक,