चाळीसगाव वगळता ‘वंचित’ची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:32 PM2019-10-31T12:32:50+5:302019-10-31T12:33:47+5:30
मनसेच्या सर्व ६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, मतविभागणीचा फायदा
जळगाव : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ मतदारसंघांपैकी मनसेने ६ मतदारसंघात तर वंचित बहुजन आघाडीने ९ मतदार संघांमध्ये उमेदवार दिले होते. मात्र वंचितच्या चाळीसगाव मतदार संघातील उमेदवाराने दिलेली लढत वगळता उर्वरीत सर्व मतदारसंघांमध्ये वंचित व मनसेचा बार फुसका ठरला आहे. मनसेच्या सर्व तर वंचितच्या ८ उमेदवारांचे डिपॉझीटही जप्त झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेने युती केली. तर काँग्रेस-राष्टÑवादीने आघाडी केली होती. मनसेने व वंचित बहुजन आघाडीने मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यातही या दोन्ही पक्षांचे उमेदवार स्वतंत्रपणे लढले. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. मनसे व वंचित बहुजन आघाडीमुळे मतांची विभागणी होईल व त्याचा फटका युती व आघाडीला बसेल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र वंचितच्या चाळीसगावच्या उमेदवाराचा अपवाद वगळता अन्य उमेदवारांनी हे अंदाज फोल ठरविले.
मनसेच्या पदरी अपयश
मनसेने जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, जामनेर, अमळनेर, चाळीसगाव या ६ मतदार संघांमध्येच उमेदवार दिले होते. परंतु सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एकाही उमेदवाराला २ टक्के देखील मते मिळालेली नाहीत. सर्वाधिक १.९१ टक्के मते जळगाव शहर मतदार संघातील उमेदवाराला मिळाली आहेत.
वंचितला चाळीसगाव वगळता अपयश
वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव शहर, भुसावळ, जामनेर, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, रावेर या ९ मतदारसंघांमध्येच उमेदवार दिले होते. मात्र चाळीसगावमधील उमेदवार मोरसिंग राठोड यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार चांगली लढत देऊ शकला नाही.
चाळीसगावला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने ३८हजार ४२९ मते म्हणजेच १७.६३ टक्के मते घेतली. त्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. मात्र अन्य ८ मतदार संघांमधील त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.