आर.आर.च्या प्रभारी मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 08:15 PM2018-08-30T20:15:35+5:302018-08-30T20:17:15+5:30
माध्यमिक शालांत परीक्षे दरम्यान आर.आर.विद्यालयात झालेल्या गैरप्रकाराला केंद्रसंचालक तथा प्रभारी मुख्याध्यापिका विजया काबरा यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव नितीन बच्छाव यांनी दिले आहे.
जळगाव : माध्यमिक शालांत परीक्षे दरम्यान आर.आर.विद्यालयात झालेल्या गैरप्रकाराला केंद्रसंचालक तथा प्रभारी मुख्याध्यापिका विजया काबरा यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव नितीन बच्छाव यांनी दिले आहे.
आर.आर.विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षेत १४ मार्च रोजी झालेल्या विज्ञान भाग एक या विषयाच्या पेपरला गैरमार्ग झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार चौकशीसाठी चार जणांची समिती नियुक्ती केली होती. त्यात नाशिक विभागीय मंडळाचे सहा.सचिव वाय.पी.निकम, सहसचिव एम.व्ही.कदम, धुळे शिक्षणाधिकारी पी.व्ही.अहिरे, नाशिक शिक्षणाधिकारी (निरंतर) एस.जी.मंडलिक यांचा समावेश आहे. या समितीने २४ मे २०१८ रोजी अहवाल सादर केला होता.
चौकशी अहवालानुसार आर.आर.विद्यालयातील परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक विजया कैलासचंद काबरा यांनी परीक्षा गोपनियतेचा भंग होऊ नये म्हणून कॅमेरे कपड्याने झाकल्याचे कबुल केले. परीक्षा कालावधीत कॅमेरे झाकण्याची आवश्यकता नव्हती. केवळ ड्रॉर्इंग हॉलमधील कॅमेऱ्यावरील कपडा खाली पडल्याने तेथील गैरप्रकार उघडकीस आला. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराचे चित्रीकरण होवू नये म्हणून कॅमेरे कपड्याने झाकल्याचे स्पष्ट झाल्याचा निष्कर्ष समितीने नोंदविला आहे. या गैरप्रकाराला केंद्रसंचालिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका विजया काबरा या जबाबदार असल्याने त्यांच्यावर एम.ई.पी.एस. नियमावली १९८१ नुसार शिस्तभंगाची कारवाई करून त्याबाबतचा अहवाल मंडळ कार्यालयास तत्काळ पाठवावा असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव नितीन बच्छाव यांनी केले दिले आहे.