उमविच्या प्र-कुलगुरुपदासाठी बोरसे व माहुलीकर यांची नावे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:20 PM2017-11-27T22:20:57+5:302017-11-27T22:23:26+5:30
उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदासाठी प्रा.अमुलराव बोरसे व प्रा.पी.पी.माहुलीकर यांची नावे चर्चेत आहे. या दोन्हींपैकी एकाची निवड प्र-कुलगुरुपदी आठवड्याभरात राज्यपालांकडून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अजय पाटील
जळगाव,दि.२७-उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदासाठी प्रा.अमुलराव बोरसे व प्रा.पी.पी.माहुलीकर यांची नावे चर्चेत आहे. या दोन्हींपैकी एकाची निवड प्र-कुलगुरुपदी आठवड्याभरात राज्यपालांकडून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नवीन विद्यापीठ कायद्याअंतर्गत विद्यापीठासाठी प्र-कुलगुरुपद हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यपालांकडून या पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे. राज्यातील कोल्हापूर, पुणे व मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाची निवड यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, विद्यापीठाकडून सप्टेंबर महिन्यातच चार जणांची नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली होती. उमविकडून पाठविण्यात आलेल्या चार नावांपैकी प्रा.अमुलराव बोरसे व प्रा.पी.पी.माहुलीकर यांची नावे सर्वात आघाडीवर आहेत.
१. कोण आहेत प्रा.अमुलराव बोरसे?
उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक म्हणून प्रा.अमुलराव बोरसे यांनी काम पाहिले आहे. विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून काही काळ त्यांच्याकडे पदभार होता. आॅगस्ट २०१७ मध्ये ते विद्यापीठातून निवृत्त झाले. निवृत्त होण्याअगोदर ते विद्यापीठाच्या स्कूल आॅफ केमिकल सायन्सेस प्रशाळेतील आॅरगॅनिक केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
२. विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर
उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या स्कूल आॅफ केमिकल सायन्सेस प्रशाळेचे प्रमुख म्हणून प्रा.माहुलीकर यांनी काही काळ काम पाहिले. त्यानंतर उमविच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे (बी.सी.यु.डी.) संचालक म्हणून काही वर्षे काम पाहिले. नवीन विद्यापीठ कायदा आल्यानंतर बीसीयुडी विभाग रद्द झाल्यानंतर विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून प्रा.पी.पी.माहुलीकर हे काम पाहत आहेत.