चाळीसगावला नगराध्यक्षांसोबत एकनाथराव खडसे यांची बंदद्वार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:46 PM2019-02-09T23:46:22+5:302019-02-09T23:46:38+5:30
भेटीगाठी
चाळीसगाव : लोकसभा निवडणुकीचा बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची चिन्हे आणि अधून -मधून लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार अशी चर्चा असताना शनिवारी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी अचानकपणे चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन अर्धा तास बंदव्दार चर्चा केले. बेलगंगा कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली. एकनाथराव खडसे यांच्या मुक्कामी भेटीगाठीचे राजकीय पटलावर वेगवेगळे अन्वयार्थ उमटले आहे.
भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते स्व. वाडिलाल राठोड यांच्या अधाकृती पुतळा अनावरण व पिंपरखेड येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या नामकरण सोहळ््यासाठी खडसे चाळीसगावी आले होते. शुक्रवारी सायंकाळीच त्यांचे येथे आगमन झाले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. माजी नगरसेवक अविनाश चौधरी यांच्या कन्येचा मध्यंतरी विवाह झाला. त्यावेळी एकनाथराव खडसे उपस्थित राहू शकले नव्हते. शुक्रवारी चौधरी कुटूंबियांची त्यांनी स्नेहभेट घेतली. सायंकाळी एका विवाह समारंभासह एका हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ््याला त्यांनी हजेरी लावली. रात्री ते शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. भेटीगाठी घेताना त्यांच्यासोबत माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, प्रदेश किसान मोर्चाचे सचिव कैलास सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नाना पवार, आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षांची घेतली भेट
शनिवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या मालेगावरोड स्थित निवासस्थानी एकनाथराव खडसे यांनी धावती भेट दिली. यावेळी आशालता चव्हाण यांच्यासह नगरसेवक राजेंद्र चोधरी, विश्वास चव्हाण यांच्यासोबत त्यांनी ३० मिनिटे बंदव्दार चर्चा केली. चर्चेत नगरपालिकेतील कामकाजाबाबत उहापोह झाल्याचे सांगितले जात आहे.
पडसाद उमटण्याची शक्यता
नगरपरिषदेच्या निवडणुकी आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून विश्वास चव्हाण यांचा भाजपात प्रवेश करुनचव्हाण यांच्या पत्नी, नगराध्यक्षा अशालता चव्हाण यांच्या विजयाचे शिल्पकार ठरतानाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आमदार उन्मेष पाटील यांनी पालिकेत सत्ता परिवर्तनही केले. चाळीसगाव तालुक्यात २०१४च्या निवडणुकीपासून भाजपाच्या गटबाजीचे प्रदर्शन होत असे. ‘जुने व नवे’ अशा वादाचा त्याला पदर आहे. जुन्या गटाकडून आयोजित बहुतांशी कार्यक्रमांना आमदारांसह त्यांच्या गटालाही टाळले जाते. त्यामुळेच एकनाथराव खडसे यांच्या नगराध्यक्षा भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या महिन्यात राजेंद्र चौधरी यांना पालिकेच्या भाजपा गटनेते पदावरुन हटवून संजय रतनसिंग पाटील यांची निवड केली गेली. दरम्यान या बंदव्दार भेटीचा तपशील उघड झाला नसला तरी राजकीय पटलावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
बेलगंगेची घेतली माहिती
सकाळी १० वाजता चित्रसेन पाटील यांच्या निवासस्थानीही खडसे गेले. येथे त्यांनी या भेटीत कारखान्याची सद्यस्थिती जाणून घेतली. महिन्याभरापूर्वीच त्यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. चित्रसेन पाटील यांनी खडसे यांना माहिती दिली. यावेळी चित्रसेन पाटील यांच्या आई व माजी नगराध्यक्षा लिलावती पाटील यांच्यासह नगरसेवक सुरेश स्वार, भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शेषराव पाटील, बेलगंगेचे संचालक दिलीप चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, उद्धवराव महाजन व अंबाजी गृपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
एकनाथराव खडसे यांनी निवासस्थानी येऊन स्नेहभेट घेतली. अस्थेवाईकपणे कुटूंबाची चौकशी करुन गप्पा केल्या. ही केवळ स्नेहभेट होती.
- आशालता चव्हाण, नगराध्यक्षा, चाळीसगाव.