जळगावात डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनिया पाठोपाठ आता जीवघेण्या ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’चा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 10:12 PM2017-09-19T22:12:44+5:302017-09-19T22:14:19+5:30
जिल्ह्यात आढळले दोन सदृश रुग्ण : एका महिलेस औरंगाबादला हलविले तर दुस:यावर जळगावात उपचार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19 - शहर व जिल्ह्यात डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनियाने थैमान घातले. आता तर ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ (मेंदूज्वर प्रकारातील आजार) हा जीवघेणा आजार हल्ला करू पाहत असून जिल्ह्यात या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एका महिलेला औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी तत्काळ हलविण्यात आले आहे तर एका रुग्णावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनियाने शहरात थैमान घातले असताना उपाययोजनांकडे मात्र अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढहोतआहे.
‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ या आजाराने पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात हल्ला केला आहे. आता र्पयत दोन रुग्ण आढळले असून यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये रावेर तालुक्यातील एका महिलेला ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ सदृश आजाराची लागण झाल्याने तिला औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून एका रुग्णावर जळगावात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्याही पाठीतील पाण्याचे नमुने मुंबई येथे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. या रुग्णाला डेंग्यू असल्याचाही अहवाल आला आहे.
कितीही अंतरावरून पोहचू शकतो कुलेक्स डास
कुलेक्स नावाच्या डासापासून ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ हा आजार होतो. ताप, डोकेदुखणे, उलटय़ा होणे, झटके येणे असे लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे केवळ घर अथवा इतर कोठेही जवळपास पाणी साचलेले नसले तरी या डासाने कोठेही व कितीही अंतरावर जाऊन चावा घेतला तर या आजाराची लागण होऊ शकते.
‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ची लागण झाली तर त्यामुळे मृत्यूचे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे असे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार घेणे व उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ या जीवघेण्या आजाराने डोके वर काढल्याने हा धोक्याचा इशारा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यात याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचाही सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे.
डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनिया पाठोपाठ आता ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ सदृश आजाराचे रुग्ण आढळून येत असून याबाबत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- डॉ. उदयसिंग पाटील.
जळगाव जिल्ह्यात ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ सदृश आजाराचे दोन रुग्ण आढळून आले असून यातील एका महिलेला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे तर एका रुग्णावर जळगावात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचा तसा अहवाल अद्याप आलेला नाही.
- डॉ. तेजेंद्र चौधरी.