उमेदवारी नाकारल्याने जळगावात भाजपातील निष्ठावंतांमध्ये असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 08:03 PM2018-07-11T20:03:05+5:302018-07-11T23:32:24+5:30
जळगाव मनपा निवडणुकीत पक्षांतराचे धमाके अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहिले. मोठ्या संख्येने उमेदवार आयात झाल्याने भाजपातील मूळ कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
जळगाव- मनपा निवडणुकीत पक्षांतराचे धमाके अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहिले. मोठ्या संख्येने उमेदवार आयात झाल्याने भाजपातील मूळ कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यामुळेच नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी आपल्या सर्व पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा महानगराध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्याकडे बुधवारी सकाळी १० वाजता दिला. यानंतर लगेचच शिवसेनेतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली.
भाजपाचे विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. की, मी पक्षाचा गेल्या २५ वषार्पासून एकनिष्ठ होतो. नगरसेवक म्हणून मी मनपात सर्वात चांगले काम केले असे वाटते. तरी सुध्दा आपण म्हणजे भाजपाने मला तिकीट दिले नाही म्हणून मी भाजपाच्या सर्व आघाडीवर असलेल्या पदाचा, सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.
भाजपात अनेकांची नाराजी
भाजपा केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्तेत असल्याने पक्षाची विविध निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शक्ती वाढली आहे. अशा स्थितीत यंदा मनपा निवडणुकीतही निश्चितच गत वेळेपेक्षा स्थिती सुधारेल,हे गृहीत धरुनच मिशन ५० प्लसचे लक्ष घेवून अनेक कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते. उमेदवारी मिळणार या आशेने अनेकांनी घरोघर संपर्क साधत प्रचाराला देखील सुरूवात केली होती. मात्र ऐनवेळी भाजपाने आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांची उमेदवारी कापली गेल्याने या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस वाढली आहे.
अनेक बंड पुकारण्याची शक्यता
माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे हे मनपा निवडणुकीपासून दूर असले तरी भाजपातील नाराज गटाने त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. काही नाराज कार्यकर्ते बंड पुकारण्याची शक्यता आहे.