गृहविलगीकरणातील रुग्णांचा कचरा घराबाहेरच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:15+5:302021-04-15T04:15:15+5:30
रुग्णांच्या बेजबाबदारपणासह महापालिकेचीही उदासीनता लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत जात आहे. यामध्ये अनेक रुग्णांना ...
रुग्णांच्या बेजबाबदारपणासह महापालिकेचीही उदासीनता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत जात आहे. यामध्ये अनेक रुग्णांना कमी लक्षणे असल्याने अशा रुग्णांना जिल्हा प्रशासनाने गृह विलगीकरणची सूट दिली आहे. यामुळे प्रशासनाच्या यंत्रणेवरील ताण काहीअंशी कमी असतो, तसेच रुग्णदेखील आपापल्यापरीने घरीच राहून कोरोनावर उपचार करून घेत आहेत. मात्र हा उपचार करून घेत असताना अनेक रुग्ण त्यांच्या बेजबाबदारपणामुळे इतरांनादेखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. कारण गृह विलगीकरणातील अनेक रुग्ण आपल्या वापरण्यात आलेल्या वस्तू व मास्क याची व्यवस्थित विल्हेवाट न लावता एक तर मोकळ्या जागांवर त्या वस्तू फेकत आहेत किंवा त्या वस्तू घरातच साठवून ठेवत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग इतरांनादेखील होण्याची शक्यता बळावली आहे.
विशेष म्हणजे या कचराकडे महापालिका प्रशासनाचेदेखील कोणतेही लक्ष दिसून येत नाही. महापालिका प्रशासनाने शहरातील कचरा जमा करण्यासाठी नेमून दिलेल्या नियमित कर्मचाऱ्यांकडूनच हा कचरा इतर कचराप्रमाणेच जमा केला जात आहे. यासाठी महापालिकेनेदेखील जैविक कचरासाठी स्वतंत्र कोणतीही व्यवस्था केलेली दिसून येत नाही. त्याचाच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून काही ठरावीक भागांमध्ये महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे अनेक रुग्ण गृह विलगीकरकणात असतानाही महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना या विशिष्ट घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे याबाबतची माहितीदेखील रहात नाही. यामुळे महापालिकेचे कर्मचारीदेखील नियमित कचरा सोबतच पॉझिटिव रुग्णांचा जैविक कचरादेखील एकाच वाहनात जमा करत आहेत. तसेच अनेक रुग्ण हा कचरा महापालिकेच्या वाहनांमध्येही न देता एखाद्या खुल्या भूखंडावर किंवा घराबाहेर फेकून देत आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे.
शहरातील एकूण रुग्ण - २७,१६१
बरे झालेले रुग्ण - २४,०५६
उपचार घेत असलेले रुग्ण - २६७२
घरी उपचार घेत असलेले रुग्ण - १३६४
- शहरात जमा होणारा एकूण कचरा - २३० टन
- ओला कचरा - १०० टन
- सुका कचरा - १३० टन
कचऱ्यातूनही पसरू शकतो कोरोना
- कोरोनाचा विषाणू हा एखाद्या वस्तूवर किंवा पदार्थावर १२ ते २४ तासपर्यंत जिवंत राहू शकतो. या वेळेत दरम्यान त्या वस्तूला किंवा पदार्थाला अन्य व्यक्तीने हात लावला तर संबंधित व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
- महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये रुग्णांचा कचरा एकाच ठिकाणी जमा केला जातो. तसेच तो कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये जमा करून घनकचरा प्रकल्प घेतला जात आहे. मात्र, गृह विलगीकरणात असलेल्या अनेक रुग्णांकडून या कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विघटन केले जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
- अनेक रुग्ण जरी घरीच उपचार घेत असलेले तरी अशा रुग्णांनी आवश्यक त्या दक्षता घेणे गरजेचे आहे. जेवणाच्या वस्तू ताट, मास्क हे रस्त्यावर किंवा कोणत्याही मोकळ्या जागेवर न फेकता तो कचरा कचराकुंडीतच जमा करावा. तसेच नागरिकांनादेखील यामुळे त्रास होणार नाही. तसेच महापालिका प्रशासनाने देखील गृह विलगीकरण आत असलेल्या रुग्णांची नोंद घेऊन त्या ठिकाणचा कचरा वेगळ्या पद्धतीने जमा करावा, जेणेकरून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता येईल.
कोट.
महापालिकेचा अभियांत्रिकी महाविद्यालयातून जमा होणारा कचरासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांचा ही कचरा व्यवस्थित जमा केला जात आहे. तसेच रुग्णांनादेखील याबाबत अधिक सजग राहणे गरजेचे आहे.
- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, महापालिका