ग्रामपंचायतींच्या तक्रारींचा आठवडाभरात निपटारा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:33+5:302021-07-20T04:13:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामपंचायतींमधील सर्व तक्रारींची स्वतंत्र नोंद करून या आठवडाभरात या तक्रारींचा निपटारा करून त्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामपंचायतींमधील सर्व तक्रारींची स्वतंत्र नोंद करून या आठवडाभरात या तक्रारींचा निपटारा करून त्याचा अहवाल द्यावा, असे सक्त आदेश नवनियुक्त सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांना दिले आहे. सीईओ डॉ. आशिया यांनी सोमवारी सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांची सकाळी ११ ते ६ अशी मॅरेथॉन बैठक घेत, विविध सूचना दिल्या.
ग्रामपंचयातींच्या गेल्या दोन वर्षांच्या तक्रारींची एका स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंद करावी, असेही डॉ. आशिया यांनी सांगितले आहे. या बैठकीत त्यांनी सर्व विभागांचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतींना दिलेल्या कर्जाची वसुली होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्याअनुषंगाने आता या कर्जाची वसुलीदेखील सीईओंकडे सुनावणी घेऊन केली जाणार आहे.
कुपोषणाचे तातडीने सर्व्हेक्षण करा
कोरोना काळात कुपोषण वाढण्याची दाट शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना डॉ. आशिया यांनी महिला व बालकल्याण विभागाला दिल्या आहेत. यासह सर्वच अंगणवाड्या व शाळांमध्ये वीज हवी, विद्यार्थ्यांना हॅण्डवॉश हवे, अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.