एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:14 PM2019-02-05T18:14:21+5:302019-02-05T18:15:28+5:30

चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चाळीसगाव तालुक्यातील दहिवद माध्यमिक विद्यालयात संस्थेने दोन जणांना मुख्याध्यापक पदाची ...

The dispute for the appointment of two headmasters in one school | एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचा वाद

एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचा वाद

Next
ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील दहिवद शाळेतील प्रकारन्यायालय आदेशाची पायमल्ली प्रकरणी सचिवांना नोटीसध्वजारोहण प्रसंगीही झाला वाद

चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चाळीसगाव तालुक्यातील दहिवद माध्यमिक विद्यालयात संस्थेने दोन जणांना मुख्याध्यापक पदाची सूत्रे दिल्यामुळे नियुक्तीचा वाद न्यायालयात गेला आहे. प्रकाश पाटोळे यांचा अर्ज शाळा न्यायाधिकरण नाशिक न्यायालयाने मंजूर करून संस्थेचे म्हणणे फेटाळले आहे. न्यायालय आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे संस्था सचिवांविरुद्ध अवमान नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या आधीही याच शाळेत शालेय पोषण आहाराच्या ठेक्यामुळे दहिवदची शाळा चर्चेत आली होती. या वादामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना न पाठवल्याने ही शाळा चार दिवस बंद होती. त्यानंतर आताही मुख्याध्यापक नियुक्तीचा वादही तालुक्यात चर्चेचा झाला आहे.
१ सप्टेंबर २०१८ रोजी दहिवद शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी प्रकाश सुकदेव पाटोळे यांना संस्थेने दिली होती. यानंतर १९ दिवसांनी म्हणजे १९ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांना पदावरुन दूर करून त्यांची पदानवती केली व प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कल्याणराव जयवंतराव वाघ यांची नियुक्ती केली होती.
ांस्थेने आपल्यावर अन्याय केला म्हणून प्रकाश पाटोळे यांनी संस्था निर्णयाविरुध्द शाळा न्यायाधिकरण नाशिक यांच्या न्यायालयात दाद मागितली. या न्यायालयाने पाटोळे यांचे म्हणणे ग्राह्य धरुन संस्थेचा निर्णय रद्दबादल ठरवून त्यावर अंतरीम स्थगिती दिली व पुढील तारीख ८ फेब्रुवारी २०१९ रोजी ठेवण्यात आली.
दोन मस्टर, दोन कॅबिनमुळे संभ्रम
न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्याध्यापक पदाची धुरा पाटोळे हेच पहात आहेत. परंतु संस्था न्यायालयाचा तो आदेश मानायला तयार नाही. या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कल्याणराव वाघ हेच कामकाज पाहतील, असे धोरण संस्थेने अंगीकारले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सद्य:स्थितीत पाटोळे यांचे कामकाज मुख्याध्यापक दालनातून, तर वाघ टिचर रुममधून कामकाज पाहत आहे. त्यामुळे शिक्षक-कर्मचारी यांचे मस्टरदेखील तीन-चार महिन्यांपासून दोन स्वतंत्र झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दोघेही म्हणतात, मीच मुख्याध्यापक पदाचे कामकाज पाहतो आहे.
संस्था सचिव अरुण निकम यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यानंतरही त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून वाघ यांच्याकडेच जबाबदारी कायम ठेवली आहे. यात न्यायालयाचा अवमान केला गेला म्हणून अरुण निकम यांना वकिलामार्फत नोटीसही बजावण्यात आली आहे. ८ रोजी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवू. तसेच आपण मागासवर्गीय असल्याने सुरुवातीपासूनच निकम यांच्याकडून त्रास दिला जात आहे. याबाबत मागासवर्गीय आयोग व पोलिसात तक्रारीदेखील याआधीच दिल्याचे पाटोळे यांनी सांगितले.
परिपत्रकानुसार जबाबदारी-निकम
संस्था सचिव अरुण निकम यांनी सांगितले की, प्रकाश पाटोळे यांना मुख्याध्यापक म्हणून संस्थेने नेमणूक केलेली नसून, बेकायदेशीर कामकाज पाहत आहे. विभागीय शिक्षण संचालक यांच्याकडे पाटोळे यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदासाठी प्रस्ताव पाठविला होता. तो त्यांनी मान्य करून संस्थकडे त्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे संस्थेने त्यांना पत्र दिले. तथापि, सेवा ज्येष्ठतेनुसार पाटोळे यांचा क्रमांक ६७ वा असल्याचे लक्षात येताच तो प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदावर शासन निर्णयाशिवाय कुणालाही नेमू नये, तोपर्यंत प्रभारी पद ठेवावे, असे परिपत्रक शासनाचे आहे. त्या परिपत्रकांनुसार वाघ यांच्याकडे प्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे.
ध्वजारोहण प्रसंगीही वाद
२६ जानेवारी २०१९ रोजी ध्वजारोहणप्रसंगी शाळेत नियुक्तीचा वाद पुढे आला होता. ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होईल याबाबत बराच वेळ वाद झाल्यामुळे गावातील लोकांनी शाळेत गर्दी केली होती. अखेर प्रकाश पाटोळे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर या विषयावर पडदा पडला.
संस्थेच्या बैठकीत विरोधकांनी केला हल्लाबोल
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत विरोधी संचालक डी.वाय.चव्हाण व इतरांनी सत्ताधारी गटाविरुद्ध हल्लाबोल केला. सत्ताधारी गटातील संचालकांमध्ये गटबाजीमुळे नियुक्तीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. परिणामी शिक्षक व कर्मचाºयांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता आहे. या प्रकारामुळे संस्थेची बदनामी होत आहे, असा आरोप डी.वाय.चव्हाण यांनी सभेत केला.

शासन परिपत्रकांनुसार माझी नियुक्ती प्रभारी मुख्याध्यापक म्हणून संस्थेने केली आहे. शाळेच्या कामकाजाबरोबरच आर्थिक, प्रशासकीय, कामकाज पाहतो आहे. दोन मुख्याध्यापक पदाची संकल्पना आपल्याला मुळीच मान्य नाही.
- कल्याणराव वाघ, प्रभारी मुख्याध्यापक, दहिवद

न्यायालयाच्या आदेशानुसार मीच शाळेचा मुख्याध्यापक असून शाळेचे काम माझ्या नियंत्रणाखाली सुरू आहे. केवळ मागासवर्गीय असल्या कारणाने सचिवांकडून त्रास दिला जात आहे. त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.
-प्रकाश पाटोळे, मुख्याध्यापक दहिवद

Web Title: The dispute for the appointment of two headmasters in one school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.