मॉर्निंग वॉक वरून नगरसेवक भगत बालाणी व पोलिसांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:05+5:302021-05-19T04:17:05+5:30
बहिणाबाई उद्यान : तर मॉर्निंग वॉकसाठी परवानगी देण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी जळगाव : मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर सोमवारी सकाळी ...
बहिणाबाई उद्यान : तर मॉर्निंग वॉकसाठी परवानगी देण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
जळगाव : मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर सोमवारी सकाळी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर, मंगळवारी पुन्हा कारवाईसाठी पोलीस रस्त्यावर उतरले होते. यावेळी शहरातील बहिणाबाई उद्याना जवळ मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई करतांना,भाजपचे नगरसेवक तथा गटनेते भगत बालाणी व पोलिसांमध्ये दंड आकारण्यावरून जोरदार शाब्दिक वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर भगत बालाणी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन नागरिकांना सकाळी साडेसहा पर्यंत मॉर्निंग वॉकसाठी मुभा देण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंध लागू असतांनाही शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाना हरताळ फासला जात असल्यामुळे मंगळवारी पुन्हा शहरातील विविध स्टेशनच्या पोलिसांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. यावेळी बहिणाबाई उद्याना जवळ पोलीस कर्मचारी इतर नागरिकांकडून दंड आकारात असतांना त्या ठिकाणी नगरसेवक भगत बालाणी हेदेखील होते. यावेळी पोलिसांनी बालाणी यांच्याकडे दंडाची मागणी केली असता, बालाणी यांनी दंड भरण्यास विरोध केला. पोलिसांनी मात्र दंड भरावा लागेल, अन्यथा पोलीस स्टेशनला जमा करणार असल्याचे सांगितल्याने हा वाद अधिकच चिघळला. यावेळी बालाणी यांनी आपण लोकप्रतिनिधी असतांनाही,पोलिसांकडून अशा प्रकारची वागणूक मिळणे योग्य नसल्याचे सांगत,पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना आणि बालाणी यांनाही शांत करून, यापुढे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडणार नसल्याचे पोलिसांना आश्वासन दिल्याने या वादावर पडला असल्याचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले.
इन्फो :
अन् बालाणी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
या प्रकारा नंतर भगत बालाणी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन मॉर्निंग वॉकसाठी मुभा देण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सकाळी पहाटे ४ ते ६.३० पर्यंत मॉर्निंग वॉकला परवानगी देण्याचे निवेदनात म्हटले आहे.
इन्फो:
नेहमी प्रमाणे मी सकाळी फिरायला गेलो होतो. यावेळी पोलीस नागरिकांकडून दंड आकारात होते. त्यांना ही कारवाई न करण्याबद्दल विनंती केली. त्यांनी या विनंतीला मान देऊन कारवाई टाळली. त्या ठिकाणी माझा पोलिसांसोबत वाद झाल्याचा कुठलाही प्रकार घडला नाही.
भगत बालाणी, नगरसेवक तथा गटनेते, भाजपा